ग्रीसमधील यशानंतर अतिका मीरचा नवी दिल्लीत सन्मान; क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी दिली शाबासकी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
 केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्यासमवेत रेसर अतिका मीर
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्यासमवेत रेसर अतिका मीर

 

ग्रीसमध्ये झालेल्या 'चॅम्पियन्स ऑफ द फ्युचर अकादमी'च्या (COTFA) दुसऱ्या फेरीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर, भारताची ११ वर्षीय युवा रेसर अतिका मीर (Atiqa Mir) हिने रविवारी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. क्रीडामंत्र्यांनी तिला तिच्या 'फॉर्म्युला-१'च्या (F1) आव्हानात्मक प्रवासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

फॉर्म्युला-१ चे स्वप्न आणि क्रीडामंत्र्यांचा पाठिंबा

क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी मुंबईत जन्मलेल्या अतिका आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. १९९२ नंतर एकाही महिलेला फॉर्म्युला-१ च्या मुख्य शर्यतीपर्यंत पोहोचता आलेले नाही. मात्र, 'एफ-१ अकादमी'चा (F1 Academy) पाठिंबा मिळवणारी अतिका ही पहिलीच भारतीय रेसर ठरली आहे. सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करताना अतिकाने लिहिले, "प्रोत्साहन आणि मोलाच्या सल्ल्यासाठी तुमचे खूप आभार. माननीय मंत्र्यांनी माझ्या नुकत्याच झालेल्या कामगिरीचे कौतुक केले, ज्यामुळे भारताचे नाव उंचावले आहे. फॉर्म्युला-१ सीट मिळवण्याच्या माझ्या स्वप्नासाठी त्यांनी मला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे."

ग्रीसमधील ऐतिहासिक कामगिरी

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिकाने ग्रीसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. चॅम्पियनशिपची फेरी २.२ जिंकताना तिने 'क्वालिफायंग' आणि 'हीट्स'मध्ये अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम शर्यत मोठ्या फरकाने जिंकली. 'चॅम्पियन्स ऑफ द फ्युचर अकादमी'च्या (COTFA) इतिहासात अशी सलग आणि निर्विवाद कामगिरी करणारी ती केवळ तिसरी ड्रायव्हर ठरली आहे. दरम्यान, २०१३ नंतर भारतात पुन्हा एकदा 'फॉर्म्युला-१' शर्यत आयोजित करण्यासाठी क्रीडामंत्री मनसुख मांडविया विशेष प्रयत्नशील असल्याची माहितीही समोर आली आहे.