COMMONWEALTH GAMES 2026: ३९ पदकांसह भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया अव्वल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 14 h ago
राष्ट्रकुल खेळ २०२६ ची सांगता, ३९ पदकांसह भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया अव्वल.
राष्ट्रकुल खेळ २०२६ ची सांगता, ३९ पदकांसह भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी तर ऑस्ट्रेलिया अव्वल.

 

ग्लासगो

पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश नसलेल्या आणि अत्यंत कमी केलेल्या क्रीडा कार्यक्रमानंतरही भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये (Commonwealth Games) शानदार प्रदर्शन करत आपल्या मोहिमेची सांगता केली आहे. भारताने एकूण ३९ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.

ग्लासगो येथे पार पडलेल्या ११ दिवसांच्या या क्रीडा महाकुंभामध्ये भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह एकूण ३९ पदके आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने ७० सुवर्णांसह एकूण १७१ पदके जिंकत पदकतालिकेत नेहमीप्रमाणे पहिला नंबर पटकावला, तर इंग्लंड (११०) आणि कॅनडा (६२) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले. यजमान स्कॉटलंड भारताएवढीच ३९ पदके जिंकूनही कमी रौप्य पदकांमुळे पाचव्या क्रमांकावर राहिला.

भारताची क्रीडा प्रकारांनुसार कामगिरी

भारताच्या वतीने बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन पाहायला मिळाले, जिथे १० पदके (७ सुवर्ण आणि ३ रौप्य) भारताच्या झोक्यात आली. याशिवाय ॲथलेटिक्स, ज्युदो, पॅरा स्पोर्ट्स आणि वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. शूटिंग, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी आणि टेबल टेनिस यांसारखे भारताचे पारंपरिक बळ असलेले क्रीडा प्रकार या पर्वातून वगळण्यात आले होते, तरीही भारतीय खेळाडूंनी परिस्थितीशी जुळवून घेत उल्लेखनीय यश मिळवले.

स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात अधिकृतरीत्या ध्वज हस्तांतरण पार पडले असून, आता २०३० च्या शताब्दी राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भारताकडे म्हणजेच अहमदाबादकडे आले आहे. २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भारत दुसऱ्यांदा या भव्य स्पर्धेचे आयोजन करणार आहे.