पाकिस्तान संघातून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान वगळले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बाबर आझम व मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंना पाकिस्तानच्या क्रिकेट संघातून वगळण्यात आले आहे. आशियाई करंडक व तिरंगी मालिका यासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा रविवारी करण्यात आली. या संघामधून बाबर आझम व मोहम्मद रिझवान या दोन खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.

तिरंगी मालिका २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये पाकिस्तानसह अफगाणिस्तान व संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश असणार आहे. त्यानंतर ९ सप्टेंबरपासून आशियाई करंडकाला सुरुवात होणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी सलमान आगा याच्याकडे पाकिस्तान संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या संघ निवडीबाबत मुख्य प्रशिक्षक माईक हेसन म्हणाले की, सध्या कसोटी, एकदिवसीय व टी-२० अशा तीन प्रकारांत खेळताना खेळाडूंचा कस लागतो. त्यामुळे तिन्ही प्रकारांत खेळाडूंनी एकसारखा फॉर्म राखण्याची अपेक्षा करणे कठोरच आहे.

बाबर आझम हा अव्वल दर्जाचा फलंदाज आहे, पण फिरकी गोलंदाजांसमोर फलंदाजी करताना त्याने आणखी वेगवान खेळ करणे गरजेचे आहे. बाबर आझम याने बीबीएल या स्पर्धेमध्ये खेळून टी-२० प्रकारातील आपल्या खेळामध्ये सुधारणा करायला हवी. दरम्यान, आता बाबर आझमला संघात पुनरागमन करण्यासाठी आपल्या खेळात बदल करावा लागणार आहे.

माईक हेसन यांनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंच्या फॉर्मबद्दल आनंद जव्यक्त केला. ते म्हणाले की, सध्या पाकिस्तानचे खेळाडू छान खेळ करीत आहेत. साहिबजादा फरहान याने सहा सामन्यापैकी तीनमध्ये सामनावीराचा मान संपादन केला आहे. इतर खेळाडूही ठसा उमटवत आहेत. बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांना वगळण्यात आले असले तरी पाकिस्तानच्या संघात इतर अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. शाहीन शाह आफ्रिदी, फखर जमान, हसन अली व हारीस रौफ या अनुभवी खेळाडूंना पाकच्या संघात संधी देण्यात आली आहे.

पाकिस्तानचा संघ 
सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारीस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदील शाह, मोहम्मद हारीस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वासीम, साहिबजादा फरहान, सईम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी व सुफयान मोकिम.