आशियाई करंडक पात्रता फेरीच्या राष्ट्रीय शिबिरामधून सुनील छेत्रीला वगळण्यात आल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले, की सराव शिबिरासाठी सुनील छेत्रीची निवड करण्यात आलेली नाही; मात्र सिंगापूरविरुद्धच्या लढतीसाठी त्याचा संघात प्रवेश होऊ शकतो. त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले आहेत.
खालिद जमील याप्रसंगी म्हणाले, की आशियाई करंडक पात्रता फेरीआधी नेशन्स करंडक होणार आहे. यासाठी होत असलेल्या सराव शिबिरासाठीच्या संघ निवडीबाबत सुनील छेत्री याच्यासोबत संवाद साधला. सुनील छेत्रीसाठी केव्हाही संघाचे दरवाजे खुले आहेत.
सराव शिबिरासाठी काही खेळाडूंच्या खेळाची चाचणी करणे आवश्यक होते. यासाठी अशा खेळाडूंची निवड करण्यात आली. दरम्यान, खालिद जमील यांच्या वक्तव्यावरून सिंगापूरविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या पात्रता लढतींच्या सामन्यांमध्ये सुनील छेत्रीचा समावेश करण्यात येईल, असे चित्र दिसून येत आहे.
तसेच खालिद जमील यांनी नेशन्स करंडकात दर्जेदार संघाविरुद्ध खेळायला मिळणार असल्याचा फायदा भारतीय खेळाडूंना घेता येणार आहे, असे म्हटले. ते म्हणाले, की नेशन्स करंडकात ताजिकिस्तान व इराण या संघांविरुद्ध भारतीय संघ लढणार आहे. या लढतींचा अनुभव भारतीय संघातील खेळाडूंना घेता येणार आहे.