भाजप कडून देशभरात सुफी आणि उलेमा परिषदांचे आयोजन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
ulema sufi and modi
ulema sufi and modi

 

भाजप आणि मुस्लिम समाज यांच्यातील दरी कमी करण्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाकडून सुफी,उलेमा परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख शहरे आणि जिल्हे यांच्यामध्ये या परिषदांचेआयोजन केले जाणार आहे.

 

भाजप आणि मुस्लिम समाज यांतील भेद दूर करून त्यांना एकत्र आणणे हा या परिषदांचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे मुस्लिम समुदायाचा विश्वास संपादन करण्याचा मानस असल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रम समन्वयक म्हणून पक्षाने मौलाना सुहैब कासमी यांची नियुक्ती केली आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना संयोजक कासमी म्हणाले,  ‘येत्या काही दिवसांत देशातील १०० लोकसभा मतदारसंघात आणि प्रमुख शहरांमध्ये अल्पसंख्याक आघाडी उलेमा आणि सुफी संमेलने घेतील. याद्वारे पंतप्रधान मोदी सरकारने मुस्लिम समाजासाठी केलेल्या विकास कामांची माहिती दिली जाईल. मुस्लिम समाज आणि भाजप यांच्यात संवाद साधला जाईल. भाजप आणि मुस्लिमांमधील दरी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.’

 

देशातील १५ प्रमुख शहरे आणि १०० जिल्ह्यांमध्ये या परिषदा होणार असून त्यामध्ये देशभक्ती आणि शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मतांची अपेक्षा न ठेवता मुस्लिमांसोबतच इतर अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना केले होते. भाजप नेत्यांनी कुठल्याही समुदायाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्ये करू नयेत असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले होते.