हुंडा प्रथेच्या विरोधात महिलांनी एकत्र यावे - प्रा. डॉ. फरजाना शेख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
सोलापूर : महिला महाविद्यालयात काव्य नाट्य सादरीकरण कार्यक्रमात बोलताना डॉ. फरजाना शेख.
सोलापूर : महिला महाविद्यालयात काव्य नाट्य सादरीकरण कार्यक्रमात बोलताना डॉ. फरजाना शेख.

 

सोलापूर : समाजात हुंडा मागणे व घेण्याची प्रथा वाईट आहे. अनेक समाजसुधारकांनी या प्रवृत्तीला संपविण्यासाठी प्रयत्न केले. हुंडा घेण्याला कायद्याने बंदी आहे, तरीसुद्धा देण्या-घेण्याची रीत म्हणून हे सगळ सुरूच आहे. महिलांनी या प्रथेला बंद करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा," असे मत प्रा. डॉ. फरजाना शेख यांनी व्यक्त केले.

महिला महाविद्यालय व खादिमाने उर्दू फोरमच्या संयुक्त विद्यमाने दख्खनचे सुप्रसिद्ध कवी सुलेमान खतीब लिखित दोन कविता सास बहू व छोरा छोरी यांचे नाट्य रुपांतरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकार अहमद शेख यांनी सांगितले की, कवी सुलेमान खतीब यांच्यातील शब्दशैली विशेष होती. त्यांच्या कवितांमध्ये दखनी भाषेतील विनोदासह भावू करण्याचे सामर्थ्य असल्याचे सांगितले.

सास बहू कवितेतून मुलींना मुलाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. एक सुशिक्षित सून घरात अनेक परिवर्तन आणू शकते, तिची कदर केली पाहिजे हा संदेश मांडण्यात आला. त्यामध्ये मुलाच्या व मुलीच्या आईचे संभाषण अतिशय मार्मिक होते. छोरा-छोरीचे सादरीकरण महिला महाविद्यालयाच्या आयेशा पठाण व तस्बीन आळंदवाले यांनी केले. सास-बहूचे सादरीकरण सुम्मया अत्तार, आयेशा बागबान यांनी केले. डॉ.सुम्मया सय्यद यांनी या नाट्यांचं दिग्दर्शन केलं होतं.

बेगम कमरुनिस्सा कारीगर गर्ल्स हायस्कूलचे अ. रशीद शेख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. निकहत शेख पाला, डॉ. जैनब नायब, गुलनार हरकरे, रुकसाना जमादार, फोरमचे खजिनदार नासिरुद्दीन आळंदकर, रफिक खान, रजिया पठाण, महेर अफरोज, अलिमोद्दीन दंडोती, नाटककार जाफर बांगी यांची विशेष उपस्थिती होती. 
 
- प्रकाश सनपूरकर, सोलापूर