आशा खोसा
बांगलादेशची निर्मिती हा इतिहासातील कोणताही जुना किंवा विस्मरणात गेलेला धडा नसून उपखंडातील ती एक जिवंत आठवण आहे. विशेषतः भारतीयांच्या दृष्टीने बांगलादेशचा जन्म हा भावनिक, राजकीय आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ धर्माच्या आधारावर जगातील पहिले आधुनिक राष्ट्र म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर, अवघ्या पंचवीस वर्षांतच बांगलादेशची निर्मिती झाली.
बांगलादेशसोबतचे भारताचे संबंध नेहमीच भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बांधीलकीतून साकारले गेले आहेत. १९७१ मध्ये बांगलादेशचा उदय होणे ही केवळ सीमांची आखणी नव्हती, तर ती एक वैचारिक क्रांती होती. हिंदू आणि मुस्लिम हे दोन स्वतंत्र राष्ट्र (कौम) असून ते एका राजकीय चौकटीत राहू शकत नाहीत, या ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या मूळ गृहितकालाच या घटनेने आव्हान दिले.
याच विचारसरणीमुळे १९४७ मध्ये फाळणी झाली आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तानची निर्मिती झाली. याउलट भारताने द्विरॅष्ट्र सिद्धांत नाकारून स्वतःला एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक म्हणून स्वीकारले. अनेक धर्म, भाषा आणि संस्कृतींचे भारत हे घर बनले. टीकाकारांनी शंका व्यक्त करूनही भारत आज विविध धर्म, संस्कृती आणि भाषांची भूमी म्हणून भरभराटीला आला आहे.
१९७१ च्या घटनांनी पाकिस्तान ज्या तर्कावर उभा राहिला होता, त्या पायालाच हादरा दिला. लाखो बंगाली नागरिक आणि भारतीय सैनिकांच्या बलिदानातून बांगलादेशचा जन्म झाला. केवळ धार्मिक ओळखीपेक्षा भाषा, संस्कृती आणि सामायिक ऐतिहासिक अनुभव हे राष्ट्रनिर्मितीचे अधिक शाश्वत आधार असू शकतात, हेच यातून सिद्ध झाले.
बांगलादेशातील प्रसिद्ध पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये 'बीएनपी' पक्ष जमात-ए-इस्लामीच्या उर्दू भाषेतील निवडणूक प्रचाराला विरोध करताना दिसतो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानने (आताचा बांगलादेश) उर्दू भाषा नाकारली होती आणि हेच पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचे मुख्य कारण ठरले होते.
बांगलादेशातील सध्याच्या राजकीय संक्रमणाच्या काळात या इतिहासाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकदा सूक्ष्म तथ्यांपेक्षा वरवरचे चित्र जास्त प्रभावी ठरते. आधुनिक माध्यम व्यवस्था आशयापेक्षा प्रदर्शनाला जास्त महत्त्व देते. अलीकडच्या प्रचारादरम्यान आंतरराष्ट्रीय पत्रकार तिथे दाखल झाले होते. बांगलादेश जमात-ए-इस्लामीची रॅली, भाषणे आणि डिजिटल माध्यमांवरील वावर पाहून एक विशिष्ट धारणा तयार करण्यात आली.
परंतु दिसणारे चित्र नेहमीच वास्तव नसते. ओरडून बोलणारा गट अनेकदा शांत असलेल्या बहुसंख्यांच्या मताला झाकून टाकतो. दक्षिण आशियातील इतर देशांप्रमाणे बांगलादेशातील निवडणूक राजकारण हे स्थानिक निष्ठा, आर्थिक आकांक्षा, पिढ्यांमधील बदल आणि ऐतिहासिक आठवणींनी बनलेले आहे. केवळ जमातच्या पुनरुज्जीवनाचे चित्र मोठे करून दाखवल्यामुळे माध्यमांनी जनभावनेचा खरा प्रवाह दुर्लक्षित करण्याची जोखीम पत्करली. शांत बसलेला बहुसंख्य समाज रस्त्यावर फलक घेऊन उतरत नाही, पण निकालाची दिशा तोच ठरवतो.
भारतीय दृष्टिकोनातून विचार केल्यास, माध्यम निर्मित लाटेपेक्षा प्रत्यक्ष राजकीय बदलाला वेगळे करणे आवश्यक आहे. जमात-ए-इस्लामीच्या वाढत्या प्रभावाबद्दलची भीती ही कदाचित मतदारांच्या वैचारिक पसंतीपेक्षा माध्यमांच्या बातम्यांच्या स्वरूपामुळे अधिक वाटली असावी.
तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनल पार्टीला (बीएनपी) मतदारांनी दिलेला कौल हा राजकीय आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अर्थांनी महत्त्वाचा आहे. एका 'कौम'ची संस्कृती ही अल्पकाळ टिकणारी नसून ती लोकांच्या स्मृतीत खोलवर रुजलेली असते, हेच या निकालाने सुचवले आहे. मतदारांनी अशा नेतृत्वाची निवड केली आहे जे आर्थिक पुनरुज्जीवन, महिला सक्षमीकरण, तरुणांच्या आकांक्षा आणि तांत्रिक आधुनिकीकरणाबद्दल बोलते. हे नेतृत्व राजकारणाला संकुचित किंवा विलगतेच्या चौकटीत मांडत नाही.
सोशल मीडियावरील कल बदलल्याचेही स्पष्ट दिसत होते. योगायोगाने निवडणुकीचा निकाल व्हॅलेंटाईन डे आणि पोइला बैसाखच्या उत्साही उत्सवाच्या काळातच लागला. ढाकामधील रंग, संगीत आणि तरुणांचा उत्साह पाहता बांगलादेशची सामाजिक वीण आजही बहुविध आणि लवचिक असल्याचे समाधान मिळाले.
धर्माला राष्ट्राचा एकमेव आधार मानण्याच्या मर्यादा काय असू शकतात, याचा धडा पाकिस्तानसाठी या निकालातून मिळाला आहे. भारतासाठी हे 'सर्वधर्म समभाव' आणि 'वसुधैव कुटुंबकम' या तत्त्वांचेच पुनरुच्चार करणारे आहे. विविधतेतच खरी ताकद असते, हे यातून पुन्हा सिद्ध झाले.
जेव्हा संपूर्ण प्रदेशातील धार्मिक समुदाय कट्टर ओळखींकडे वळत आहेत, तेव्हा बांगलादेशचा हा निवडणूक संदेश एक आठवण करून देतो: राष्ट्राचा विजय हा विलगतेत नसून सर्वांना सामावून घेण्यात असतो.
भारतासाठी ऐतिहासिक हितसंबंध आणि भौगोलिक जवळीक या दोन्ही कारणांमुळे अशी आशा आहे की, बांगलादेशची राजकीय उत्क्रांती लोकशाही संस्था बळकट करेल, महिला आणि तरुणांना सक्षम करेल आणि प्रादेशिक स्थिरता अधिक दृढ करेल. उपखंडाचे सामायिक भविष्य याच गोष्टीवर अवलंबून आहे.