दहशतवाद्यांवर कारवाईच्या भारताच्या मागणीकडे कॅनडाचे दुर्लक्ष

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

 

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचं जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलं होतं. मात्र, भारताने हे आरोप फेटाळले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सध्या बिघडलेले आहेत.

यातच आता भारत सरकारने कॅनडावर नवे आरोप केले आहेत. कॅनडामधील फुटीरतावादी संघटनांवर कारवाई करण्याची भारताने यापूर्वी वारंवार मागणी करूनही, ट्रुडो सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या फुटीरतावादी संघटना दहशतवादी ग्रुप्सना पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, कॅनडामध्ये अशा प्रकारच्या 9 फुटीरतावादी संघटना आहेत. या संघटना दहशतवादी संघटनांना पाठिंबा देतात. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भारत सरकार वारंवार करत आहे. दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येमध्येही याच संघटनांचा हात होता, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कॅनडा सरकार देतंय आश्रय
भारताने कॅनडा सरकारला यापूर्वी कित्येक वेळा वॉन्टेड दहशतवादी आणि गँगस्टर यांच्या हद्दपारीची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, ट्रुडो सरकार अशा व्यक्तींना आणि संघटनांना आश्रय देत आहे.
दहशतवादी कारवायांमध्ये हात असलेले आठ दहशतवादी, तेवढेच गँगस्टर आणि कित्येक पाकिस्तानी ISI एजंट कॅनडामध्ये आश्रय घेत असल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यामध्ये 1990 च्या दशकातील कुख्यात दहशतवादी गुरवंत सिंग याचाही समावेश आहे.

पत्ता देऊनही कारवाई नाही
गुरप्रीत सिंग, अर्शदीप सिंग, सतिंदरजीत सिंग ब्रार (गोल्डी ब्रार) अशा कित्येक गँगस्टर्सना हद्दपार करण्याची मागणी भारताने केली आहे. यातील गुरप्रीतचा कॅनडामधील पत्ताही भारताने ट्रुडो सरकारला दिला आहे. मात्र, तरीही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.