कॅनडाला 'एनर्जी महासत्ता' बनायचे असेल तर भारताशी व्यापार आवश्यक- मंत्री टीम हॉजसन

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 d ago
कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्री टीम हॉजसन
कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्री टीम हॉजसन

 

पणजी (गोवा):

गोव्यात आयोजित 'इंडिया एनर्जी वीक'मध्ये पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्री टीम हॉजसन यांनी मंगळवारी भारताच्या ऊर्जा बाजारपेठेचे महत्त्व अधोरेखित केले. भारत ही जगातील सर्वात महत्त्वाची ऊर्जा बाजारपेठ म्हणून उदयास येत असून, वाढती जागतिक मागणी पाहता नवी दिल्लीसोबतचे व्यापारी संबंध अधिक दृढ करणे कॅनडासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

टीम हॉजसन यांची ही भेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली आहे. 'इंडिया एनर्जी वीक'मध्ये कॅनडाच्या संघराज्य मंत्र्यांची ही पहिलीच उपस्थिती असून, तब्बल आठ वर्षांनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील ऊर्जा संवाद पुन्हा सुरू झाला आहे. हॉजसन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "जर कॅनडाला ऊर्जेच्या क्षेत्रात महासत्ता बनायचे असेल, तर आपल्याला आपली नैसर्गिक संसाधने जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारताला पुरवणे गरजेचे आहे".

पुढील दशकात भारतातील पारंपरिक आणि स्वच्छ ऊर्जेची मागणी चीन आणि संपूर्ण आग्नेय आशियाच्या एकत्रित मागणीपेक्षाही अधिक असेल, असा अंदाज हॉजसन यांनी वर्तवला आहे. अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांना केल्या जाणाऱ्या निर्यातीत वाढ करण्यासाठी कॅनडा प्रयत्नशील असून, भारत ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. कॅनडा भारताला लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG), स्वच्छ ऊर्जा, युरेनियम आणि दुर्मिळ खनिजे पुरवठा करण्यासाठी सज्ज असून यासाठी तरंगत्या साठवणूक सुविधांसारख्या पायाभूत सुविधांचा वापर केला जाईल.

या कार्यक्रमात बोलताना भारताचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक असून २०५० पर्यंत जागतिक ऊर्जा मागणीतील भारताचा वाटा १० टक्क्यांपर्यंत पोहोचेल. भारताचे दरडोई ऊर्जा उत्पन्न अद्याप जागतिक सरासरीच्या ४० टक्केच असल्याने ही वाढ आवश्यक आणि जबाबदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. टीम हॉजसन आपल्या या दौऱ्यात भारतीय मंत्री आणि उद्योजकांशी भेट घेऊन नव्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीचा पाया रचणार आहेत.