चिनी ड्रॅगन अमेरिकेविरुद्धच्या युद्धाच्या तयारीत?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बिजिंग अर्थात चीन अमेरिकेविरुद्ध युद्धाच्या तयारीत असल्याचा दावा भारतीय अमेरिकन असलेल्या आणि रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या निकी हेली यांनी केला आहे. त्यांनी चीन हा अमेरिका आणि जगासाठी अस्तित्वाचा धोका असल्याचे म्हटले आहे.

चीन हा अमेरिका आणि जगासाठी अस्तित्वाचा धोका असल्याचे वर्णन करताना चिनी ड्रॅगन अमेरिकेविरुद्धच्या युद्धाच्या तयारीत असल्याचे हेली यांनी म्हटले आहे.

भारतात जन्माला आलेल्या निकी हेली यांनी भाषणात सांगितले की, अमेरिकेला पराभूत करण्यासाठी चीनने गेल्या अर्ध्या शतकापासून तयारी केली आहे. काही बाबतीत चिनी सैन्य अमेरिकेच्या सशस्त्र दलांच्या बरोबरीचे आहे. कम्युनिस्ट असलेल्या चीनचा सामना करण्यासाठी सामर्थ्य आणि देश अभिमान आवश्यक आहे.

चीनने अमेरिकेच्या नोकऱ्या काढून घेतल्या आहेत असा आरोप हेली यांनी केला आहे. औषधांपासून ते प्रगत तंत्रज्ञानापर्यंत महत्त्वाच्या उद्योगांवर चीनचे नियंत्रण आहे. विक्रमी काळात चीन आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातून बाहेर पडून आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था बनला आहे. चीनचा क्रमांक एकवर येण्याचा मानस असून त्यांचा हेतू स्पष्ट आहे.

सैन्य तयार करून ते अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित आहेत याचबरोबर एशीयावर वर्चस्व गाजवण्यासाठी ते सक्षम असल्याचेही त्या म्हणाल्या. याचबरोबर त्यांचा गुप्तचर विभाग आपल्या आकाशात फुगे पाठवत आहे. आपल्या किनाऱ्यापासून अगदी जवळच क्युबा मध्ये गुप्त तळ उभारत आहे. असेही यावेळी हेली म्हणाल्या.