भारताने फेटाळले कॅनडाचे आरोप; दिलं जोरदार प्रत्युत्तर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
कॅनडाचे पंतप्रधान मंत्री जस्टिन ट्रुडो, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली
कॅनडाचे पंतप्रधान मंत्री जस्टिन ट्रुडो, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली

 

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांना परराष्ट्र मंत्रालयाने काल (मंगळवारी) सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताने दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाने केलेले आरोप फेटाळले आहेत. कॅनडाने केलेले आरोप हे आरोप प्रेरित आणि मूर्खपणाचे आहेत असं मंत्रालयाने म्हटलं आहे. असे आरोप केवळ त्या खलिस्तानी दहशतवादी आणि कट्टरपंथींपासून लक्ष हटवण्यासाठी आहेत ज्यांना कॅनडात दीर्घकाळ आश्रय देण्यात आला आहे आणि जे भारताच्या प्रादेशिक एकता आणि अखंडतेसाठी सतत धोका आहेत, असंही भारताने पुढे म्हटलं आहे. 

परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांच्या वक्तव्यावर टीका
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत निज्जर यांच्या हत्येचा संबंध भारताशी जोडलेल्या विधानाचे खंडन केले आहे. याशिवाय परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांच्या वक्तव्यावरही टीका केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत हा एक मजबूत लोकशाही देश आहे, जिथे कायद्याच्या राज्यासाठी बांधिलकी आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, खलिस्तानी दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांच्या कारवायांशी संबंधित प्रकरणांमध्ये कॅनडाचे सरकार काहीही करण्यास असमर्थता राहिले आणि हा आमच्यासाठी दीर्घकाळ चिंतेचा विषय राहिला आहे.

कॅनडाच्या नेत्यांवरतीही केली टीका
या प्रकरणी कॅनडाच्या नेत्यांवरही भारताने टीका केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कॅनडातील अनेक राजकीय नेते उघडपणे खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत सहानुभूती व्यक्त करतात, ही चिंतेची बाब आहे. खून, मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांना कॅनडा सातत्याने सामावून घेत आहे हे काही नवीन नाही. आम्ही अशा कोणत्याही कारवायांमध्ये भारताचा सहभाग स्पष्टपणे नाकारतो आणि कॅनडा सरकारला भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या भारतविरोधी घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन करतो.

काय आहे प्रकरण?
कॅनडा आणि भारत यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. कॅनडाने भारताच्या एका उच्चपदस्थ आधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. हे संपूर्ण प्रकरण हरदीप सिंह निज्जर हत्या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित आहे. या हत्येच्या तपासात भारतीय हस्तक्षेप करत असल्याचा कॅनडाच्या सरकारचा आरोप आहे. निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारचा कट असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारत सरकारवर आरोप
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतबाबत मोठं वक्तव्य केले आहे. भारत सरकार आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येचा तपास करण्यात देशातील सुरक्षा यंत्रणा व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ओटावा येथील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना ट्रूडो म्हणाले की, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संभाव्य संबंधाच्या आरोपांची चौकशी करत आहेत.

कोण आहे हरदीप सिंग निज्जर?
निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. तो गेली अनेक वर्षे कॅनडात राहत होता आणि तेथून भारताविरुद्ध खलिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालत होता. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जर गेल्या वर्षभरात भारतीय तपास यंत्रणांसाठी आणखी मोठी डोकेदुखी बनला होता कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात मदत आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती.

२०१८ मध्ये जेव्हा ट्रुडो भारत भेटीवर आले होते. त्यावेळी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी दिली होती, ज्यामध्ये निज्जर यांच्या नावाचाही समावेश होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२० मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

२०१० मध्ये पटियाला येथील मंदिराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. हिंसाचार भडकावणे, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे यासह अनेक प्रकरणांत पोलीस त्याचा शोध घेत होते.

भारत सरकारने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. एनआयएने त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.