काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानची लुडबूड नवीन नाही. मात्र काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात (UN) भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतानेही जशास तसं उत्तर देत पाकिस्तानला फटकारलं आहे.
काश्मीरबाबत तुर्कस्तान आणि पाकिस्तानने काही वक्तव्य केली होती. भारताने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि तुर्कीला रोखठोक उत्तर दिलं आहे. काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न असून कोणत्याही देशाने त्यात हस्तक्षेप करू नये, असं भारताने म्हटलं.
तुर्कस्तान यापुढे असं काही करणार नाही, अशी आशा भारताने व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर करण्याच्या पाकिस्तानच्या वृत्तीबद्दल भारतानेही निराशा व्यक्त केली. याआधीही पाकिस्तानने विविध मुद्द्यांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र यावेळी तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 55 व्या सत्राला संबोधित करताना भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंग यांनी म्हटलं की, भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर तुर्कीच्या टिप्पणीशी आम्ही सहमत नाही. काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला.
अनुपमा सिंह यांनी म्हटलं की, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर करत आहे. भारताविरोधात उघडपणे खोटं बोलत आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण परिसर भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानला आमच्या अंतर्गत मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.
जो देश यूएनएससीने मंजूर केलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देतो. त्यांचा उत्सवही साजरा करतो, त्याला भारतावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. पाकिस्तान सरकार आपल्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यात अयशस्वी ठरला आहे. पाकिस्तान जगभरातील दहशतवादाला प्रायोजित करतो, अशा कठोर शब्दात अनुपमा सिंह यांनी पाकिस्तान खडोबोल सुनावले.