पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल
पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल

 

जेव्हापासून एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी स्विकारली तेव्हापासूनच ट्विटर या-ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ट्विटरने आपल्या पॉलिसीमध्ये अनेक फेरबदल केल्याचे दिसून येत आहेत. अशातच आता ट्विटरने मोठी कारवाई करत पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक केलं आहे.

 

ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतामध्ये ब्लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरच्या गाईडलाईन्सनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीनंतर ट्विटर हँडल ब्लॉक करावे लागते.

 

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. या प्रकरणामध्ये भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलं आहे की, "भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचे भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे."

 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्याची ही आत्तापर्यंतची तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै २०२२  मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु नंतर ती बंदी हटवण्यात आली आणि अकाउंट भारतात पुन्हा दिसू लागलं होतं. आता पुन्हा ट्विटरने भारतात पाकिस्तान सरकारचे ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.