मंत्र्याच्या हकालपट्टीनंतर इस्राईलमध्ये आंदोलन भडकले

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि  इस्राईल संरक्षण मंत्री
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि इस्राईल संरक्षण मंत्री

 

न्यायव्यवस्थेत सुधारणा करून न्यायालयांचे अधिकार कमी करण्याच्या इस्राईल सरकारच्या प्रयत्नांना विरोध करणाऱ्या संरक्षण मंत्र्यांची पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हकालपट्टी केली. यामुळे सरकारविरोधात सुरु असलेले आंदोलन अधिकच भडकले आहे. आंदोलकांनी अनेक रस्त्यांवर ठाण मांडत रस्ते अडवून धरले. अनेक ठिकाणी जाळपोळीचेही प्रकार घडले.

 

सरकारला अपेक्षित असलेल्या सुधारणांविरोधात इस्राईलमध्ये महिनाभरापासून जनतेची निदर्शने सुरु आहेत. याविरोधाला न जुमानता पंतप्रधान नेतान्याहू यांनी संसदेत सुधारणांच्या दिशेने एक पाऊल टाकत त्यासंदर्भातील एक प्रस्तावही मंजूर करून घेतला.

 

मात्र, निदर्शने न थांबता ती तीव्र होत नागरिकांनी जाळपोळही सुरु केल्यावर नेतान्याहू यांना मंत्रिमंडळातूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. देशाचे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलन्ट यांनी देशाच्या आणि जनतेच्या भल्यासाठी नेतान्याहू यांनी सुधारणा मागे घ्याव्यात, असे रविवारी आवाहन केले होते.

 

काहीही झाले तरी सुधारणा मंजूर करून घ्यायच्याच, या निर्णयावर ठाम असलेल्या नेतान्याहू यांनी या विरोधाची गंभीरपणे दखल घेत त्यांची तातडीने पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरून आज आंदोलने आणखी तीव्र करण्यात आली.

 

आंदोलकांनी जबाबदारीने वागावे : नेतान्याहू

आंदोलनानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज प्रथमच जनतेबरोबर संवाद साधला. ‘आंदोलकांनी जबाबदारीने वागावे आणि हिंसाचारापासून दूर रहावे, असे आवाहन नेतान्याहू यांनी केले आहे.

 

आंदोलनामुळे अनेक उद्योगपतींनी, तपास संस्थांच्या माजी प्रमुखांनी आणि अमेरिकेसह इतर मित्रदेशांनीही चिंता व्यक्त केली आहे. सत्ताधारी लिकुड पक्षातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. सुधारणांचा विचार सोडून दिला तरच पक्षाचा पंतप्रधान नेतान्याहू यांना पाठींबा असेल, असा इशारा सांस्कृतिक मंत्री मिकी जोहार यांनी दिला आहे.

 

सरकारच्या माघारीची चिन्हे

विविध शहरांमधून आंदोलक जेरुसलेममध्ये येऊन धडकत असल्याने पंतप्रधान नेतान्याहूंवरील दबाव वाढत आहे. देशाचे अध्यक्ष आयझॅक हरझॉग यांनीही नेतान्याहू यांच्यावरील दबाव कायम ठेवला आहे. त्यामुळे नेतान्याहू यांना आपली योजना गुंडाळून ठेवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.