पाकिस्तानी मॉडेल एरिका रॉबिन (वय २४) हिने 'मिस युनिव्हर्स पाकिस्तान' ही स्पर्धा जिंकली आहे. ती आता जगातील प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा विश्व सुंदरी स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणार असली तरी एरिकाला देशात टीकेला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमधील धार्मिक नेत्यांपासून अगदी काळजीवाहू पंतप्रधानही या स्पर्धेवर व त्यात एरिकाच्या सहभागावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
'ही स्पर्धा म्हणजे पाकिस्तानचा अपमान आहे,' असे येथील कट्टरवादी धार्मिक नेत्यांचे म्हणणे आहे. या स्पर्धेच्या आयोजकांवर सरकारने कारवाई करण्याची मागणी इस्लामिक विद्वान ताकी उस्मानी यांनी केली आहे. कुमारी रॉबिन पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची कल्पना देखील हटवावी, असे ते म्हणाले. पाकिस्तानी नेते मुश्ताक अहमद खान यांनी 'एक्स'वर पोस्ट करीत ‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान'वर टीकास्त्र सोडले आहे. "या सौंदर्य स्पर्धेचे पाकिस्तानमधील आयोजक कोण आहेत? हे लज्जास्पद कृत्य कोण करत आहे," असे सवाल त्यांनी केले आहेत. हे वृत्त ब्रिटनमधील 'इंडिपेंडंट' या ऑनलाइन वृत्तपत्राने दिले आहे.
गुप्तचर संस्थेला चौकशीचा आदेश
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी स्पर्धेच्या आयोजकांची चौकशी करण्याचा आदेश देशातील गुप्तचर संस्थेला दिला आहे आणि पाकिस्तानच्या मान्यतेशिवाय देशाच्या नावाने ही स्पर्धा कशी आयोजित केली, याचा तपास करण्यास सांगितले आहे. मालदीवमधील या स्पर्धेचे आयोजन हे लाजिरवाणे कृत्य असून पाकिस्तानातील महिलांचा अपमान आणि शोषण, आहे, अशी टीका काकर यांनी केली आहे.
दुबईतील कंपनीकडे आयोजन
मालदिवमध्ये झालेली ही सौंदर्य स्पर्धा दुबईतील 'युगेन ग्रुप' या कंपनीने आयोजित केली होती. स्पर्धेत सहभागासाठी पाकिस्तानी महिलांकडून अर्ज मागविणारी जाहिरात मार्चमध्ये प्रसिद्ध झाली होती. युगेन ग्रुप' तर्फे 'मिस युनिव्हर्स बहारिन' व 'मिस युनिव्हर्स इजिप्त' या स्पर्धांचेही आयोजन केले जाते.
पाकिस्तान सुंदरीकडून निमंत्रण
‘मिस युनिव्हर्स पाकिस्तान' ही स्पर्धा गेल्या गुरुवारी (ता.१४) मालदीवमध्ये पार पडली. त्यात एरिका रॉबिन विजेती ठरली. सायबर सुरक्षा तज्ज्ञ जेसिका विल्सन हिने द्वितीय क्रमांक मिळाला. हिरा इनाम, मलिका अल्वी आणि सबरिना वसीम या सौंदर्यवतीही अंतिम फेरीत होत्या. 'व्हॉइस ऑफ अमेरिका' या अमेरिकेच्या रेडिओशी बोलताना एरिका म्हणाली, "आंतरराष्ट्रीय पातळीवरील विश्व सुंदरी स्पर्धेत पाकिस्तान प्रथमच सहभागी होईल, असा विश्वास होता. आता माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे." एरिका रॉबिन ही ख्रिस्ती आहे. तिच्या विजयाचा आनंद तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून व्यक्त केला. "आपली. संस्कृती सुंदर आहे, पण मीडियात त्याबद्दल बोलत नाही. पाकिस्तानी लोक खूप उदार, दयाळू आणि आगत्यशील आहेत. माझ्या देशाला भेट देण्याचे निमंत्रण मी सर्वांना देत आहे. पाकिस्तानी लज्जतदार पदार्थाचा आस्वाद घेऊन तेथील निसर्गसौंदर्य, हिमाच्छादित पर्वतांचा आनंद घ्यावा. "एरिकाचा जन्म १४ सप्टेंबर १९९९ मध्ये कराचीत झाला आहे. तिचे महाविद्यालयीन शिक्षण चंडीगडला झाले. २०२०मध्ये तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय पाकिस्तानचे काळजीवाहू मंत्री मूर्तजा सोलांगी म्हणाले, “'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाकिस्तानने कोणाचेही नाव घोषित केलेले नाही.”