इराणवरील हल्ल्याचा निर्णय ट्रम्प यांनी लांबणीवर टाकला; हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ६ एप्रिलपर्यंतची मुदत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (२७ मार्च २०२६) इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा इशारा तूर्तास मागे घेतला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी तेहरानला दिलेली मुदत आता ६ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेली चर्चा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

इराणने हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद ठेवल्यास अमेरिका तिथल्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करेल, असा इशारा ट्रम्प यांनी आधी दिला होता. आता मात्र त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला आहे. अमेरिकेने असा कोणताही हल्ला केल्यास प्रादेशिक पायाभूत सुविधांसह पाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर (डिसॅलिनेशन फॅसिलिटी) प्रतिहल्ला करण्याची धमकी इराणने आधीच दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली. तत्पूर्वी, हे युद्ध संपण्याबाबत वॉल स्ट्रीटवर पुन्हा एकदा शंका निर्माण झाल्याने अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती आणि तेलाच्या किमतीही वाढल्या होत्या. दरम्यान, इस्रायलने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नौदलाचे कमांडर अलीरेझा तांगसिरी यांना ठार केल्याचा दावा केला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखण्यासाठी तांगसिरी थेट जबाबदार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इराणने मात्र तांगसिरी यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.