रशियाच्या तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा भारतावर व्यापारी हल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्काची घोषणा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीही काही निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. तसेच, रशियाकडून तेलखरेदी करण्यात चीननंतर भारताचाच क्रमांक लागतो, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे निर्बंध फक्त भारतावरच लादणार की इतरांवरही असणार, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध करणाऱ्या रशियाकडून तेलखरेदी करत असल्याबद्दल भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लागू केले आहे. मागील आठवड्यात लागू केलेले २५ टक्के आयातशुल्क आज (ता. ७) रात्रीपासून लागू होणार आहे, तर अतिरिक्त शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होईल. भारतावर अमेरिकेने एकूण ५० टक्के आयातशुल्क लादले असून, इतर कोणत्याही देशावर त्यांनी लागू केलेल्या आयातशुल्कापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. 

'व्हाइट हाऊस'मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी भारतावर लादलेल्या आयातशुल्काबाबत प्रश्न विचारले. युक्रेन आणि रशिया यांच्यात शस्त्रसंधी झाल्यास भारतावरील आयातशुल्क रह करणार का, असे ट्रम्प यांना विचारले असता, 'ते नंतर ठरवले जाईल, सध्या तरी त्यांच्यावर आम्ही ५० टक्के शुल्क लागू केले आहे,' असे त्यांनी सांगितले. तसेच, रशियाकडून तेल खरेदीत भारतापेक्षा चीन आघाडीवर असताना भारतावरच का निर्बंध लादले, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी, 'अतिरिक्त शुल्क जाहीर करून काही तासच उलटले आहेत, पुढे काय होते बघू. यानंतरही बरेच काही निर्बंध लादलेले तुम्हाला दिसतील." चीनवरील शुल्कात वाढ करणार का, असे विचारले असता ट्रम्प यांनी 'शक्य आहे' असे उत्तर दिले.

पुतीन-ट्रम्प भेट शक्य
रशियाबरोबर तडजोड करून युद्ध तातडीने थांबविण्यासाठी युक्रेनचे नागरिक मागणी करत असल्याने येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले असल्याचे रशियातर्फे सांगण्यात आले. ही भेट घडवून आणण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र विभाग काम करत असून भेटीचे ठिकाण आणि वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुतीन यांच्याबरोबरील त्यांची ही पहिलीच भेट असेल.