जगाने इस्रायलला पॅलेस्टिनी लोकांचा छळ करण्याचा जणू परवाना दिला असूनव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील जीवन हे शारीरिक आणि मानसिक छळाचे अखंड चक्र बनले आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका तज्ज्ञाने म्हटले आहे. १९६७ पासून व्याप्त असलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशातील मानवी हक्कांच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी फ्रँसेस्का अल्बानीज यांनी सोमवारी आपले मत मांडले. इस्रायलमध्ये छळ आता प्रभावीपणे राज्याचे धोरण बनले आहे, असे त्यांनी नमूद केले.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर आपला ताजा अहवाल सादर करताना अल्बानीज म्हणाल्या, "इस्रायलला प्रभावीपणे पॅलेस्टिनींचा छळ करण्याचा परवाना मिळाला आहे. कारण तुमच्यापैकी बहुतांश सरकारांनी आणि मंत्र्यांनी तशी परवानगी दिली आहे." छळ आणि नरसंहार शीर्षक असलेल्या या अहवालात त्यांनी म्हटले की, जे एकेकाळी अंधारात चालत असे ते आता उघडपणे केले जात आहे. ही अत्यंत उच्च राजकीय स्तरावर मंजूर केलेली संघटित अपमान, वेदना आणि मानहानीची व्यवस्था आहे. छळ हा केवळ तुरुंगातील कोठड्या आणि चौकशी कक्षांपुरता मर्यादित राहिलेला नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानुसार, सामूहिक विस्थापन, वेढा, अन्न आणि मदतीचा नकार, लष्करी आणि स्थायिकांचा अनियंत्रित हिंसाचार, सतत पाळत ठेवणे आणि दहशत यामुळे हा प्रदेश सामूहिक शिक्षेची जागा बनला आहे. जगण्याच्या परिस्थितीचा नाश झाल्यामुळे नरसंहाराचा हिंसाचार हा सामूहिक छळाचे साधन बनला आहे. याचे पॅलेस्टिनी जनतेवर दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक परिणाम होत आहेत.
व्याप्त वेस्ट बँक आणि गाझावरील युद्धाबाबत इस्रायलच्या कृतींवर टीका करणाऱ्या अल्बानीज यांना इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. त्यांना या पदावरून हटवण्याची मागणीही जोर धरत आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ पासून गाझावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात किमान ७२,२६३ लोक मारले गेले असून १७१,९४४ जण जखमी झाले आहेत. व्याप्त वेस्ट बँकमध्ये ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायली अधिकाऱ्यांनी १८,५०० हून अधिक पॅलेस्टिनींना अटक केली. यामध्ये फेब्रुवारीपर्यंत किमान १,५०० मुलांचा समावेश होता, असे अहवालात आढळले आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलच्या मिशनने अल्बानीज यांच्या अहवालावर कडाडून टीका करत त्यांना गोंधळ पसरवणारा एजंट म्हटले आहे. अल्बानीज आपल्या संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर द्वेष पसरवण्यासाठी करतात आणि दहशतवादी संघटनांचे समर्थन करणारी विधाने करून इस्रायलचे अस्तित्व धोक्यात आणत आहेत, असा आरोप इस्रायलने एका निवेदनात केला आहे. अल्बानीज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांना छळ आणि नरसंहाराच्या कृत्यांना प्रतिबंध आणि शिक्षा करण्याचे तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने पॅलेस्टिनींवरील अशी कृत्ये सहन करणे सुरूच ठेवले, तर कायद्याचा अर्थच उरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.