देशातील दिग्गज माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस कंपनीने चालू आर्थिक वर्षात ४० हजार फ्रेशरची नियुक्ती करणार असल्याच्या वृत्ताला कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर एन. गणपथी सुब्रमण्यम यांनीही याला दुजोरा दिला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून मोठ्या संख्येने फ्रेशरची भरती करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील अन्य दिग्गज कंपन्यांनी भरती न करण्याची भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर टीसीएसचा हा निर्णय फ्रेशरना दिलासा देणारा आहे.
सध्या कर्मचारी भरतीबाबत आव्हानात्मक परिस्थिती असून, देशातील काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे सत्र राबविले आहे, मात्र, टीसीएस कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची कोणतीही योजना नाही, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले. इन्फोसिससारख्या काही दिग्गज कंपन्यांनी मागणी वाढेपर्यंत नवी भरती विशषेतः कॅम्पस भरती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही निकालांदरम्यान, इन्फोसिसने वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी सांगितले, की कंपनीने मागील वर्षी ५० हजार फ्रेशर घेतले होते, मात्र सध्या अमेरिकेतून येणारी मागणी कमी असल्याने स्थिती सुधारेपर्यंत कॅम्पसमधून फ्रेशरची नियुक्ती करणार नाही.
गेल्या १२ ते १४ महिन्यांत मागणीत मोठी घसरण झाली. तरीही आता आम्ही गरजेपेक्षा अधिक कर्मचारी घेत आहोत. साधारणपणे वार्षिक ३५ ते ४० हजार नवे कर्मचारी नियुक्त केले जातात. कंपनीचा वापर दर सध्या सुमारे ८५ टक्के आहे, पूर्वीच्या ८७ ते ९० टक्क्यांपेक्षा त्यात किरकोळ घट झाली आहे. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची कोणतीही योजना नाही, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.
ठळक बाबी
-
टीसीएस आर्थिक वर्ष २०२४ साठी तब्बल ४० हजार फ्रेशरची नियुक्ती करणार
-
कंपनीच्या सीओओंचा माहितीला दुजोरा
-
सेवांची मागणी वाढल्यास पूर्ण करण्यासाठी कंपनी सज्ज
यावेळी टीसीएस कंपनीचे सीओओ एन.गणपथी सुब्रमण्यम यांनी कंपनीच्या सद्य स्थितीची माहिती देताना सांगितल की, कंपनीच्या सहा लाख कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे दहा टक्के,म्हणजे सुमारे ६० हजार कर्मचारी गेल्या वर्षभरात आवश्यक प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करून कामासाठी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे कंपनीकडे कामांची मागणी वाढल्यास ती पूर्ण करण्यास कंपनी सज्ज आहे.