आयेशा अयुब : विज्ञान, शायरी अन् डिजिटल विश्वाचा सुरेख संगम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
आयेशा अयुब
आयेशा अयुब

 

ओनिका माहेश्वरी

व्यापार आणि उद्योगाच्या जगात यशाची व्याख्या नेहमी भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारातील मागणी या गोष्टींशी जोडली जाते. परंतु, सोशल आंत्रप्रिन्युअर, डिजिटल मार्केटर आणि शायरा आयेशा अयुब यांचा जीवनप्रवास एक वेगळाच दृष्टिकोन समोर ठेवतो.

उद्योगाची खरी ताकद ही माणसांशी जोडले जाण्यात, एकमेकांना प्रगतीची संधी देण्यात आणि सोबत पुढे जाण्यात दडलेली असते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. लखनऊ शहराला आपली कर्मभूमी बनवणाऱ्या आयेशा यांनी डिजिटल मार्केटिंगला फक्त उपजीविकेचे साधन बनवले नाही, तर त्या माध्यमातून लहान व्यावसायिक आणि महिलांना एकत्र आणून पुढे नेण्याचे काम केले.

विविध संस्कृतींचा प्रवास अन् लखनऊची साथ
मुंबईत जन्म आणि सौदी अरेबियामध्ये बालपण गेलेल्या आयेशा यांचा प्रवास अनेक संस्कृती अन् अनुभवांतून समृद्ध झाला. त्यांचे वडील सुमारे २५-२६ वर्षे सौदी अरेबियात व्यवसाय करत होते. तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आणि त्यांनी उर्दू भाषा शिकली.

पुढे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कुटुंबाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मुंबईऐवजी लखनऊची निवड करण्यात आली. त्यांचे मूळ घर फैजाबाद (सध्याचे अयोध्या) येथे होते आणि त्या काळात लखनऊ वेगाने विकसित होत होते. इयत्ता ११ वीत असताना त्या लखनऊला आल्या अन् पुढील प्रवासाला सुरुवात झाली.

सौदी अरेबियाच्या आणि महानगरीय वातावरणातून थेट उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक वातावरणात होणारा बदल सोपा नव्हता. परंतु, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्याच्या या गुणानेच त्यांना पुढे व्यवसायात मोठी मदत केली.

त्यांच्या बहिणीने 'CMS' शाळेच्या प्रवेश परीक्षेदरम्यान लखनऊ शहरावर एक उपरोधिक निबंध लिहिला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शाळा प्रशासनाला तो निबंध इतका आवडला की तिला प्रवेश मिळाला आणि पुढे जाऊन तीच बहीण एक यशस्वी रेडिओ जॉकी बनली.
 

डॉक्टर बनण्याचे स्वप्न अन् साहित्याची आवड
आयेशा यांच्या कारकीर्दीची सुरुवात व्यवसायापेक्षा शिक्षण अन् साहित्याशी जोडलेली होती. कुटुंबात अनेक डॉक्टर असल्याने त्यांनीही वैद्यकीय क्षेत्रात जावे, अशी घरच्यांची इच्छा होती. त्यांचे काका डॉक्टर होते आणि वडिलांनी लखनऊमध्ये एक रुग्णालय उभारले होते.

घरच्यांचा वैद्यकीय क्षेत्राकडे कल असताना आयेशा यांची आवड मात्र साहित्य, भाषा आणि लेखनात होती. त्या काळात कला शाखेकडे (Arts) पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा चांगला नव्हता. त्यामुळे त्यांना इच्छेविरुद्ध सायन्स घेऊन ५ वर्षे बायोलॉजीचा अभ्यास करावा लागला. आज मात्र त्या या अनुभवाला स्वतःची मोठी ताकद मानतात.

"इल्म कभी जाया नहीं होता!" (ज्ञान कधीच वाया जात नाही!) असे त्या आत्मविश्वासाने सांगतात. आज त्यांच्याकडे अनेक डॉक्टर, डाएटिशियन आणि वैद्यकीय क्षेत्रातील ग्राहक आहेत. सायन्सच्या या पार्श्वभूमीमुळे त्यांना त्यांच्या ग्राहकांचे काम अन् विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते.

शायरी अन् इंग्रजी लेखनातून समृद्ध झालेली कला
बालपणापासूनच आयेशा यांना लेखनाची आवड होती. त्या इंग्रजीत निबंध लिहायच्या आणि १२ वीत असताना त्यांनी आपली पहिली शायरी रचली. त्यांच्या आई उर्दूतील प्रसिद्ध मासिके 'महकता आंचल' आणि 'पाकीज़ा आंचल' वाचायच्या. या मासिकांतील कथा अन् गजलांमुळे त्यांच्या मनात साहित्याबद्दल आवड निर्माण झाली.

सौदी अरेबियात शिकलेल्या उर्दूला त्यांनी नंतर पद्धतशीरपणे अभ्यासून शायरीच्या खाचखळग्यांवर प्रभुत्व मिळवले. आज विज्ञान, भाषा, साहित्य आणि डिजिटल दळणवळण या सगळ्यांचा मेळ हीच त्यांची खरी ताकद बनली आहे.

कोरोनाचा काळ अन् अनपेक्षित वळण
आयेशा यांच्या व्यावसायिक आयुष्याला खरा कलाटणी देणारा टप्पा कोरोनाच्या काळात आला. त्यांनी करिअरची सुरुवात थेट फ्रीलान्सर म्हणून केली नव्हती. त्या लखनऊमधील एका मोठ्या डिजिटल एजन्सीमध्ये 'कंटेंट लीड' म्हणून कार्यरत होत्या.

कोरोनाच्या काळात एजन्सीचे अनेक क्लायंट्स सोडून गेले आणि आर्थिक अडचणींमुळे कंपनीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली. याच प्रक्रियेत अचानक त्यांचीही नोकरी गेली.

नोकरी जाणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता, पण याच संकटातून त्यांच्यातील उद्योजिकेचा जन्म झाला. त्यांनी स्वतःचा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू केला. कोरोना महामारी ही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रासाठी 'वरदान' (Blessing in Disguise) ठरली. झूम मीटिंग्स, ऑनलाईन वेबिनार्स आणि 'वर्क फ्रॉम होम' मुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स व्यवसायाचे मुख्य केंद्र बनले.

लहान व्यावसायिकांना दिला मदतीचा हात
याच काळात अनेक महिलांनी घराघरांतून स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आयेशा यांच्या सुरुवातीच्या ग्राहकांमध्ये अशाच महिलांचा समावेश होता.

त्यांनी या महिलांना डिजिटल ओळख निर्माण करून दिली. इथूनच त्यांच्या व्यवसायात 'सहकार्य' ही मुख्य संकल्पना बनली. केवळ सोशल मीडिया अकाउंट सांभाळणे म्हणजे मार्केटिंग नव्हे, तर लहान व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

लहान शहरांमध्ये डिजिटल मार्केटिंगचे काम करताना अनेक आव्हाने येतात. आयेशा यांच्या मते, लहान शहरांतील लोक अजूनही डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व पूर्णपणे ओळखत नाहीत आणि योग्य मोबदला देणे टाळतात. त्या स्वतःच्या अनुभवातून सांगतात: "Cheap clients are very expensive!"

म्हणजेच, कमी पैसे देणारे ग्राहक अनेकदा तुमचा जास्त वेळ, ऊर्जा आणि संसाधने वाया घालवतात. म्हणूनच व्यवसायात फक्त ग्राहकांची संख्या महत्त्वाची नसून कामाचा दर्जा आणि संबंध महत्त्वाचे असतात.

'HER' मंचाच्या माध्यमातून महिलांना बळ
व्यवसायातील सर्वात मोठे भांडवल म्हणजे 'नेटवर्किंग'! कोरोनाच्या काळातच आयेशा यांनी महिलांसाठी 'HER' (Hurdle Empower Rise) नावाचा एक नेटवर्किंग मंच सुरू केला. MSME अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या या मंचाचा उद्देश केवळ महिलांचा ग्रुप बनवणे हा नव्हता, तर त्यांना नोकरी, व्यवसाय, आर्थिक संधी आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणे हा होता.

आयेशा यांच्या मते, नेटवर्किंग म्हणजे केवळ ओळखी वाढवणे नव्हे, तर संधींचे दरवाजे उघडणे होय. जर तुम्हाला माणसांशी जोडले जाता येत असेल, तर नव्या संधी आपोआप समोर येतात. त्यांचे सुरुवातीचे ग्राहकही याच नेटवर्किंगमधून मिळाले होते. या मॉडेलमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला तिच्या व्यवसायात मदत करते, तिसरी महिला तिला ग्राहक शोधून देते. अशा प्रकारे ही केवळ संपर्कांची यादी न राहता आर्थिक संधींची एक साखळी बनते.

पुरुषांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज
महिला सक्षमीकरणाबद्दल बोलताना त्या म्हणतात की, महिलांना पुढे नेण्यासोबतच पुरुषांच्या मानसिकतेत बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या मुली अधिक आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी आहेत, पण पुरुषांची मानसिकता बदलण्यावर समाजाने फारसा भर दिलेला नाही.

पितृसत्ता पद्धती केवळ महिलांचे नुकसान करत नाही, तर पुरुषांवरही कौटुंबिक अन् आर्थिक जबाबदाऱ्यांचा मोठा ताण टाकते. जर पती आणि पत्नी दोघेही कमावते असतील, तर घरातील अन् पैशांची जबाबदारीही दोघांनी वाटून घेतली पाहिजे. सहकार्य म्हणजे केवळ व्यवसायातील नेटवर्किंग नव्हे, तर घरातील जबाबदाऱ्यांची समान वाटणी होय.

कौटुंबिक आव्हाने अन् कामाचे गांभीर्य
कामकाजी महिलांच्या अडचणींबद्दल बोलताना त्यांनी आपल्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. एकदा रात्री उशिरा ग्राहकाचा फोन आल्यावर घरातील लोकांनी त्यांना प्रश्न विचारले, पण काही वेळातच त्यांच्या वकील पतीला ग्राहकाचा फोन आला तेव्हा ते अगदी सामान्य मानले गेले.

आजही महिलांच्या व्यवसायाला पुरुषांच्या कामांइतके गंभीरतेने घेतले जात नाही. अर्थात, ही समस्या कोणत्याही एका धर्मापुरती किंवा समाजापुरती मर्यादित नसून सर्वत्र पाहायला मिळते.

AI तंत्रज्ञान अन् नव्या पिढीचा दृष्टिकोन
बदलत्या काळात आयेशा यांनी आपल्या व्यवसायात 'AI' (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर सुरू केला आहे. AI मुळे कोणाची नोकरी जाणार नाही, तर जे लोक AI चा प्रभावी वापर शिकतील तेच पुढे जातील, असे त्या मानतात.

आपल्या भावाच्या शब्दांची आठवण करून देत त्या म्हणतात, "AI will not replace you, but people using AI will replace you!" भविष्यातील यशाचा पाया तंत्रज्ञानाशी स्पर्धा करणे हा नसून त्याला समजून आपल्या कामाचा भाग बनवणे हाच आहे.

आजची 'Gen Z' पिढी स्पष्टपणे 'नाही' म्हणायला शिकली आहे. या पिढीकडे प्रचंड बुद्धिमत्ता आणि नवीन विचार आहेत, फक्त त्यांना योग्य दिशा अन् जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. मात्र, ही नवी पिढी स्वतःच्या भाषा अन् संस्कृतीपासून दूर जात असल्याची खंतही त्या व्यक्त करतात.

शायरीतून स्वातंत्र्याचा अन् स्वावलंबनाचा संदेश
आयेशा यांचा व्यवसाय अन् त्यांची शायरी एकमेकांपासून वेगळी नाही. त्यांच्या गजलांमधून आणि शेरा मधून महिलांचा स्वतंत्र विचार अन् स्वावलंबन दिसून येते.

"मोहब्बत मोहब्बत अम्मा जाइए, जरूरत-वरूरत अम्मा जाइए…" आणि "ये औरत की नजरें हैं, सब जानती…" यांसारख्या त्यांच्या रचनांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

नव्या पिढीतील महिलांना संदेश देताना त्या म्हणतात की, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, सतत नवीन गोष्टी शिकत राहा, स्वतःचा आवाज उठवा आणि स्वप्नांसाठी वेळ काढा. केवळ पदवी किंवा नोकरीने यश मिळत नाही, तर सतत शिकणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे, मजबूत नेटवर्क उभारणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे यामुळेच माणूस आयुष्यात पुढे जाऊ शकतो!
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News