एलिना दाऊदानी : आहारशास्त्राला घराघरांत पोहोचवणारा नवमातांचा आधारस्तंभ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
एलिना दाऊदानी
एलिना दाऊदानी

 

विदुषी गौर

आजच्या डिजिटल युगात नवमातांच्या समोर माहितीचा मोठा महापूर आलेला असतो. बाळाचा आहार, त्याचे संगोपन, लहान मुलांची काळजी या विषयांवर शेकडो सल्ले, व्हिडिओ आणि लेख उपलब्ध असतात. पण या अथांग माहितीच्या साठ्यात नक्की कशावर विश्वास ठेवावा आणि काय योग्य आहे, हे ठरवणे पालकांसाठी मोठे आव्हान ठरते.

पालकांच्या मनातील हाच गोंधळ दूर करण्यासाठी मुंबईच्या एलिना दाऊदानी यांनी 'मॉमफंडा' (Momfunda) या डिजिटल व्यासपीठाची पायाभरणी केली. बालसंगोपन, मुलांचे पोषण आणि सुरुवातीची काळजी याविषयी पालकांना अत्यंत सोप्या भाषेत पण शास्त्रशुद्ध ज्ञान देणे, हा या व्यासपीठाचा मुख्य ध्यास आहे. उच्च शैक्षणिक ज्ञानाचे रुपांतर एका यशस्वी डिजिटल व्यवसायात कसे करता येते, याचा वस्तुपाठच एलिना यांनी आपल्या या उपक्रमातून घालून दिला आहे.

शिक्षण, विज्ञान अन् उद्योजकतेची सांगड
मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या एलिना यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात आहारशास्त्र, माता-बाल आरोग्य आणि उद्योजकता यांच्या सुरेख संगमाने केली.

त्यांनी 'डायटेटिक्स, मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशन' या विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) मिळवली आहे. सध्या त्या अमेरिकेतील जगप्रसिद्ध 'पर्ड्यू युनिव्हर्सिटी'मधून (Purdue University, Indiana) न्यूट्रिशन सायन्समध्ये पीएच.डी. चे संशोधन करत आहेत.

आपले हे उच्च दर्जाचे शैक्षणिक ज्ञान त्यांनी केवळ रुग्णालये किंवा कॉलेजच्या वर्गांपुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी हे क्लिष्ट शास्त्रीय नियम साध्या, सोप्या भाषेत थेट डिजिटल माध्यमांतून घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. याच विचारातून 'मॉमफंडा'चा जन्म झाला.

 
'मॉमफंडा': केवळ पाककृती नाही, तर ज्ञानाचे दालन
अनेकदा बालसंगोपनाशी संबंधित पोर्टल्सवर केवळ वेगवेगळ्या पाककृती किंवा अन्नपदार्थांच्या याद्या दिल्या जातात. एलिना यांनी हा रटाळ मार्ग पूर्णपणे नाकारला.

त्यांनी 'मॉमफंडा'ला एका शैक्षणिक व्यासपीठाचे रूप दिले. बाळाला एखादा आहार का द्यावा आणि त्यामागचे विज्ञान काय आहे, हे मातांना समजावून सांगण्यावर त्यांचा भर राहिला. त्यांच्या 'द एबीसी ऑफ फीडिंग राइट' (The ABCs of Feeding Right) या विशेष अभ्यासक्रमाचा उद्देश पालकांचे ज्ञान आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हाच आहे.

या पद्धतीमुळे पालकांना एक मोठा फायदा होतो. बाळाला काय खायला द्यावे अन् काय देऊ नये, याची केवळ यादी देण्याऐवजी आहारशास्त्र आणि बालविकासाचे मूलभूत तत्त्वच पालकांना शिकवले जाते. यामुळे पालक स्वतःच्या बुद्धीने आणि आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेऊ शकतात.

विश्वासार्ह माहिती हीच खरी संपत्ती
इंटरनेटच्या जगात आज लोक भ्रामक माहितीला कंटाळले असून त्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीची नितांत गरज आहे. एलिना यांच्याकडे असलेले सखोल विषयज्ञान हीच 'मॉमफंडा'ची सर्वात मोठी ताकद ठरली.

शास्त्रीय पुराव्यांवर आधारित (Evidence-based) माहिती पुरवल्यामुळे पालकांमध्ये या व्यासपीठाबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला. ऑनलाइन कोर्सेस, शैक्षणिक संसाधने आणि पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी आपले ज्ञान रुग्णालयाच्या चार भिंतींच्या बाहेर काढून जगभरातील मातांपर्यंत पोहोचवले आहे.

एका महिला उद्योजकासाठी डिजिटल माध्यमांनी सीमांचे बंधन पूर्णपणे काढून टाकले आहे. भौगोलिक मर्यादा ओलांडून विविध शहरांतील, वेगवेगळ्या गावांतील मातांपर्यंत थेट पोहोचणे आता शक्य झाले आहे.
 

'इंडियन गॅलॅक्टागॉग्स': संस्कृती अन् विज्ञानाचा मिलाफ
एलिना यांच्या संशोधन कार्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे त्यांचे 'इंडियन गॅलॅक्टागॉग्स' (Indian Galactagogues) हे पुस्तक! बाळंतपणानंतर मातेचे दूध वाढवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पारंपरिक भारतीय पदार्थांचा सखोल अभ्यास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.

आपल्या संस्कृतीत बाळंतपण आणि आहाराबाबत आजी-पणजीच्या काळापासून अनेक चालीरीती चालत आल्या आहेत. यातील काही गोष्टी खरोखरच गुणकारी असतात. एलिना यांनी कोणत्याही परंपरेला आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी किंवा नाकारण्याऐवजी, त्याला आधुनिक आहारशास्त्राच्या निकषांवर तपासून पाहिले.

भारतीय खाद्यसंस्कृतीतील या पारंपरिक ज्ञानाला त्यांनी आधुनिक विज्ञानाची जोड दिली. यामुळे नवमातांना आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवतानाच त्यामागील शास्त्रीय कारणही स्पष्ट समजते.

ज्ञान हीच खरी भांडवली ताकद
पारंपरिक व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी मोठी जागा, कारखाना किंवा भौतिक साहित्याची गरज एलिना यांना भासली नाही. त्यांचे उच्च शिक्षण, संशोधन, प्रामाणिक अनुभव आणि पालकांच्या समस्यांची उत्तम जाण हीच त्यांची खरी भागभांडवल ठरली.

आजच्या बदलत्या काळात महिला आपल्या उच्च शैक्षणिक पात्रतेचा वापर करून ज्ञानावर आधारित डिजिटल साम्राज्य कसे उभे करू शकतात, याचे एलिना दाऊदानी या एक उत्तम आदर्श आहेत.

आपल्या मुलांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटणाऱ्या पालकांसाठी त्या एक आधारवड बनल्या आहेत. अमेरिकेत पीएच.डी. चे संशोधन सांभाळत त्यांनी उभा केलेला हा उपक्रम शिक्षण, व्यवसाय आणि समाजसेवा यांचा एक अप्रतिम संगम आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter