Ebola Update: बेंगळुरूमध्ये इबोला संशयित युगांडाच्या महिलेची चाचणी नेगेटिव्ह; आरोग्य मंत्रालयाचा मोठा दिलासा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशातून नुकतीच प्रवास करून बेंगळुरूमध्ये आलेल्या एका २८ वर्षीय महिला नागरिकाची इबोला (Ebola) चाचणी नेगेटिव्ह आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किरकोळ लक्षणे दिसल्यानंतर या महिलेला बेंगळुरूमध्ये विलगीकरणात (Isolation) ठेवण्यात आले होते, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.

या २८ वर्षीय महिलेला बेंगळुरू येथील सरकारी महामारी रोग रुग्णालयात देखरेखीसाठी आणि पुढील तपासणीसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

पुणे एनआयव्हीचा अहवाल नेगेटिव्ह
महिलेला किरकोळ अंगदुखीचा त्रास होत असल्याने खबरदारी म्हणून तिच्या रक्ताचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) पाठवण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल आता प्राप्त झाला असून, तिला इबोला विषाणू संसर्ग (EVD) झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित महिला सध्या पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित स्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून
आफ्रिकेतील काही भागांमध्ये अलिकडच्या काळात इबोला विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संबंधित राज्य प्रशासनाच्या आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने मंत्रालय कडक पाळत ठेवून असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व आवश्यक सार्वजनिक आरोग्य प्रोटोकॉल पाळले जात आहेत.

भारतात सध्याच्या घडीला इबोलाचा एकही संशयित किंवा पुष्टी झालेला रुग्ण आढळलेला नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सरकार अत्यंत सतर्क असून सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि देशात प्रवेशाच्या नियुक्त ठिकाणांवर प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि देखरेख सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा आणि अफवा पसरवणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.