नवी दिल्ली
भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील संयुक्त लष्करी सराव 'एक्सरसाइज माउंटेन गार्डियन' (Exercise Mountain Guardian) उत्तराखंडमधील चौबाटिया येथे सुरू झाला आहे. पर्वतीय युद्धावर (Mountain Warfare) विशेष भर देणाऱ्या या सरावात दोन्ही देशांचे मिळून एकूण ९२ लष्करी जवान सहभागी झाले आहेत.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सरावात दोन्ही लष्करांचे समान प्रतिनिधित्व असून एकूण ९२ जण सहभागी झाले आहेत. भारतीय सैन्य दलातर्फे 'भैरव बटालियन'चे जवान, तर यूएई सैन्यातर्फे 'माउंटन इन्फंट्री बटालियन'चे जवान यात सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही लष्करांमधील महिला अधिकारी आणि महिला योद्धेही विविध विशेष भूमिकांमध्ये या सरावात सहभागी होत आहेत.
५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या सरावाचा मुख्य उद्देश परस्पर समन्वय, आपुलकी आणि सहकार्य वाढवणे हा आहे. यादरम्यान दोन्ही देशांचे जवान संयुक्त नियोजन, सामरिक कवायती, फायटिंग प्रॅक्टिस, पाळत ठेवणे, ड्रोन ऑपरेशन्स, शारीरिक तंदुरुस्ती प्रशिक्षण आणि रॉक क्लायंबिंगसारख्या आव्हानात्मक मोहिमा पार पाडणार आहेत. तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन्स आणि पर्वतीय प्रदेशातील युद्धाची तांत्रिक कौशल्ये यादरम्यान आदान-प्रदान केली जाणार आहेत.