मुन्नी बेगम
सरकारी नोकरीची वाट पाहत न बसता, आसाममधील एका २२ वर्षांच्या धडपड्या तरुणाने मधमाशी पालनाच्या माध्यमातून रोजगाराची एक नवी वाट शोधून काढलीये. अवघ्या एका पेटीपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज चांगलाच बहरलाय. दरवर्षी सुमारे १.५ टन शुद्ध आणि नैसर्गिक मधाचे उत्पादन घेत हा तरुण वर्षाला लाखो रुपयांची कमाई करतोय. तो फक्त मधच विकत नाही, तर आसामबाहेर मधमाशा आणि पेटी पुरवण्याचे कामही करतो. राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी तो आज एक मोठा प्रेरणास्त्रोत बनलाय. हा यशस्वी तरुण व्यावसायिक आहे आसामच्या कामरुप जिल्ह्यातील बैहाटा चारियालीजवळील बिहडिया गावचा बिकी हुसेन.
सुरवातीला बिकीने मुकालमुआ येथील खादी आणि ग्रामोद्योग मंडळ तसेच खानापारा येथील कृषी विभागाकडून मधमाशी पालनाचे रीतसर प्रशिक्षण घेतले. सरकारी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यातच खरे यश आहे हे त्याला पटले. बाजारात भेसळयुक्त आणि रसायने मिसळलेला मध मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना, लोकांना अगदी शुद्ध मध पोहोचवण्याचा निर्धार त्याने केला.
'आवाज - द व्हॉईस'शी विशेष बोलताना बिकी म्हणाला, "आजकाल बाजारात शुद्ध आणि नैसर्गिक मध सहजासहजी मिळत नाही. ग्राहकांना नैसर्गिक मध हवा असतो, पण बहुतांश वेळा त्यांना रसायने मिसळलेला मध खरेदी करावा लागतो. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. हीच समस्या सोडवून लोकांना आरोग्यदायी, शुद्ध मध पुरवण्याच्या उद्देशाने मी या व्यवसायात उतरलो."
२,२०० रुपयांच्या पेटीपासून सुरुवात
बिकीने अवघ्या २,२०० रुपयांच्या भांडवलावर फक्त एक पेटी खरेदी करून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी मधमाशा उडून जायच्या, तर कधी पोळी नष्ट व्हायची. तरीही त्याने हार मानली नाही.
त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना बिकी म्हणाला, "शुरुवातीला बऱ्याचदा मधमाशा उडून जायच्या. त्या घटनांमुळे मी खूप दुःखी व्हाइचो, पण चिकाटी आणि निष्ठेने काम करत राहिलो तर एक दिवस नक्कीच यश मिळेल, हा विश्वास मी मनात ठेवला."
अखेर त्याच्या संयमाचे फळ मिळाले. आज बिकी हुसेनकडे स्वतःच्या देखरेखीखाली सुमारे ७५ पेट्या आहेत. कोरड्या हंगामात ही संख्या १५० ते २०० पर्यंत वाढते. एका पेटीत साधारणपणे आठ पोळी असतात. या पोळ्यांचे भाग करून नव्या वसाहती तयार करत त्याने आपला व्यवसाय हळूहळू वाढवला.
भारतीय अन् इटालियन मधमाशांचा फरक
बिकी प्रामुख्याने 'एपिस सेराना इंडिका' (Apis cerana indica) या भारतीय प्रजातीच्या मधमाशांपासून मध गोळा करतो. याशिवाय, जेव्हा कोरड्या हंगामात उत्पादन जास्त असते, तेव्हा तो पश्चिम बंगाल आणि बिहारमधून 'एपिस मेलिफेरा लिगुस्टिका' (Apis mellifera ligustica) या इटालियन प्रजातीच्या मधमाशा खरेदी करतो.
दोन्ही प्रजातींमधील फरक स्पष्ट करताना बिकी म्हणाला, "भारतीय मधमाशा एका पेटीतून सुमारे ८ ते १० किलो मध देतात, तर इटालियन प्रजाती ३० ते ४० किलोपर्यंत उत्पादन देते. पण इटालियन मधमाशा आसामच्या दमट पावसाळ्यात जास्त काळ टिकू शकत नाहीत, तर भारतीय प्रजाती आपल्या नैसर्गिक वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेते. इटालियन प्रजातीचे उत्पादन जास्त असले तरी पावसाळ्यात नैसर्गिक अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक माशा मरतात. त्यामुळे दरवर्षी नवीन इटालियन माशा खरेदी कराव्या लागतात."
'नॉर्थ ईस्ट हनी' अन् बाजारपेठेत दबदबा
बिकी हुसेन फक्त आपल्या 'नॉर्थ ईस्ट हनी' या ब्रँडखाली बाजारात मध विकण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो सरकारी विभाग, स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) मधमाशा, पेट्या आणि इतर साहित्य पुरवतो. याशिवाय तो विविध प्रकारच्या मसाल्यांचा पुरवठाही करतो.
सध्या बिकी मधाचे विविध प्रकार आणि स्वाद उपलब्ध करून देतो. यात मल्टीफ्लोरा, मोहरी, लिची, जांभूळ आणि आसाम लेमन हनी यांचा समावेश आहे. तो अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मेघालयसारख्या शेजारील राज्यांनाही मधमाशी पालनाचे साहित्य पुरवतो. त्याच वेळी, तो अनेक इच्छुकांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवत आहे. सरकारी मदतीबद्दल बोलताना बिकीने सांगितले की, त्याला खादी मंडळाकडून १० पेट्या आणि कृषी विभागाकडून १ पेटी अनुदानाच्या रूपात मिळाली.
नैसर्गिक प्रक्रियेतून उत्पादन अन् चक्र
मधमाशांची संख्या कशी वाढते हे सांगताना बिकीने स्पष्ट केले की, पेटीतील आठ पोळ्यांपैकी काही भाग वेगळा करून नवीन पेटीत ठेवला जातो, जिथे नवीन वसाहत तयार होते. विशेष म्हणजे या नवीन वसाहतीतील माशा स्वतःची राणी माशी नैसर्गिकरीत्या तयार करतात. या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे वसाहतींची संख्या वाढवून बिकीने आपले मध उत्पादन या टप्प्यापर्यंत आणले आहे.
पावसाळ्यात जेव्हा प्रतिकूल हवामानामुळे नैसर्गिक अन्नाची कमतरता भासते, तेव्हा मधमाशांना जिवंत ठेवण्यासाठी साखरेचा पाक दिला जातो. मात्र, या काळात मधाचे उत्पादन होत नाही. अस्सल मध हा केवळ फुलांच्या रसापासून तयार होतो, कृत्रिम अन्नापासून नाही, हे बिकी स्पष्ट करतो. त्यामुळे शुद्ध मधाच्या उत्पादनासाठी अनुकूल नैसर्गिक वातावरण आणि मुबलक फुलांची उपलब्धता आवश्यक असते. विशेषतः डिसेंबर ते एप्रिल या काळात निसर्गात मुबलक फुले येतात, त्यामुळे हा काळ मध उत्पादनाचा मुख्य काळ ठरतो.
अडचणींवर मात आणि यशाची गरुडझेप
मधमाशी पालनातील आव्हानांबद्दल बोलताना बिकी म्हणाला, "'स्मॉल हाईव्ह बिटल' नावाचा एक उपद्रवी कीटक पोळ्यांमध्ये अंडी घालतो. त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या एका रात्रीत संपूर्ण पोळे उद्ध्वस्त करू शकतात. याशिवाय मुंग्या, मधमाशा खाणारे पक्षी, पाली आणि गांधीलमाशांचा हल्ला या सामान्य समस्या आहेत. त्यामुळे मधमाशांचे रक्षण करण्यासाठी आणि पेट्या स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते. दर दोन दिवसांनी पोळ्यांची बारकाईने पाहणी करावी लागते."
या सर्व आव्हानांनंतरही बिकी आज मधमाशी पालनातून वर्षाला सुमारे २ ते ३ लाख रुपयांची कमाई करतोय. त्याच्या या व्यवसायाने इतर दोन जणांना रोजगारही मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय सांभाळत बिकी त्याचे 'एमबीए'चे शिक्षणही पूर्ण करत आहे.
आसाममध्ये मधमाशी पालकांची संख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही, याकडे लक्ष वेधत बिकी म्हणाला, "आसाममध्ये मधमाशी पालनाच्या क्षेत्रात अफाट वाव आहे. योग्य नियोजन आणि प्रशिक्षणासह या व्यवसायात उतरल्यास कोणीही स्वावलंबी बनू शकते. केवळ मध विकूनच नाही, तर नवीन वसाहती, पोळी आणि पेट्या विकूनही चांगले उत्पन्न मिळवता येते."
भविष्यात आपला व्यवसाय आणखी वाढवण्याचा बिकीचा मानस आहे. सध्या त्याच्या मधाला बाजारात ६०० रुपये प्रतिकिलो भाव मिळतोय. अवघ्या एका पेटीने सुरू झालेला हा प्रवास आज त्याला स्वावलंबनाचे एक यशस्वी उदाहरण बनवून गेलाय.
चिकाटी, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर एका छोट्या सुरुवातीचे रूपांतर मोठ्या यशात होऊ शकते, हे या तरुण व्यावसायिकाने दाखवून दिले आहे. बिकी हुसेनच्या या यशाची कहाणी आसाममधील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वावलंबनाची एक नवी वाट नक्कीच दाखवेल.