राष्ट्रीय सुरक्षेचे 'सुपरकॉप' अजित डोवाल यांना आज पुण्यात 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान केला जाणार!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 d ago
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

पुणे

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना आज, शनिवारी पुण्यात प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६' ने सन्मानित करण्यात येणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सामरिक धोरणांसाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार दिला जात आहे.

कुणाच्या हस्ते मिळणार पुरस्कार?

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त हा सोहळा पार पडत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

कोण-कोण उपस्थित राहणार?

पुण्यातील गुलटेकडी भागातील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर हा भव्य कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

डोवाल यांना पुरस्कार कशामुळे?

  • राष्ट्रीय सुरक्षेतील मोलाचा वाटा: दहशतवादविरोधी कारवाया, अत्यंत गुप्त मोहिमा (Covert missions) आणि सीमा सुरक्षेत त्यांनी बजावलेली कामगिरी जबरदस्त आहे.

  • संकटमोचक: 'ऑपरेशन ब्लॅक थंडर', 'बालाकोट एअर स्ट्राईक' आणि चीनसोबतचा अत्यंत नाजूक 'डोकलाम वाद' सोडवण्यात त्यांनी अत्यंत कळीची भूमिका बजावली आहे.

  • दीर्घ अनुभव: १९६८ च्या बॅचचे 'आयपीएस' (IPS) अधिकारी असलेले डोवाल, अनेक दशके 'इंटेलीजन्स ब्युरो' (IB) मध्ये कार्यरत होते. ते सध्या देशाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे 'राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार' आहेत.

पुरस्काराचे स्वरूप काय?

१९८३ मध्ये सुरू झालेल्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, सायरस पूनावाला आणि शरद पवार यांसारख्या दिग्गजांना मिळाला आहे.