मलिक असगर हाशमी
लखनौच्या गल्लीबोळांत फुललेली बालपणीची एक साधी-सुधी मैत्री आज देशातील सर्वात सुंदर प्रेमकहाणी बनून समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे धडाडीचे ग्रुप कॅप्टन आणि गगनयान मिशनचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची ही गोष्ट. एक निडर फायटर पायलट अन् ॲस्ट्रोनॉट म्हणून आख्खे जग त्यांना ओळखते. या कणखर माणसाच्या हृदयात एक अतिशय सुंदर अन् निष्पाप प्रेमकहाणी गुपचूप आकार घेत होती.
पहिली भेट अन् अबोल मैत्री
शुभांशु शुक्ला आणि कामना मिश्रा यांची पहिली भेट लखनौच्या शाळेत, तिसऱ्या वर्गात झाली. त्या वेळी शुभांशु अत्यंत लाजाळू आणि शांत स्वभावाचे लहान मूल होते. दुसरीकडे कामना समंजस आणि साध्या मिजाजाच्या होत्या.
दोघांमध्ये मैत्री जुळली. शाळेच्या अभ्यासासोबत ही मैत्री अधिक घट्ट होत गेली. वर्गातील बाकावरून सुरू झालेला हा सोबतचा प्रवास कधी प्रेमात बदलला, हे दोघांनाही कळले नाही.
अंतर वाढले, पण प्रेम टिकून राहिले
१२ वीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांचे रस्ते वेगळे झाले. अवघ्या १६ वर्षांच्या वयात शुभांशु यांची 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी'साठी (NDA) निवड झाली. दुसरीकडे कामना यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला अन् पुढे जाऊन त्या डेंटिस्ट बनल्या. दोघे शारीरिकदृष्ट्या नक्कीच दूर गेले होते, परंतु अंतःकरणातील अंतर कधीच वाढले नाही.
शुभांशु मनातील गोष्ट ओठांवर आणायला नेहमीच कचरायचे. त्यांची ही शांतता कामना न सांगता समजून जायच्या. कठीण प्रशिक्षण, शिस्तबद्ध आयुष्य अन् वेगवेगळ्या शहरांमधील वास्तव्य असूनही दोघांचा एकमेकांवरील विश्वास अढळ राहिला.
खास मित्र विशाल श्रीवास्तव ठरले साक्षीदार
दोघांच्या या नात्याचे सर्वात मोठे साक्षीदार ठरले त्यांचे बालपणीचे मित्र विशाल श्रीवास्तव. विशाल हे गेल्या ३० वर्षांपासून कामना यांचे राखी भाऊ आहेत, तर शुभांशु यांच्यासोबत त्यांची ३६ वर्षे जुनी घट्ट मैत्री आहे.
शाळेच्या दिवसांपासून ते लग्नापर्यंत दोघांच्या नात्यातील प्रत्येक वळण जवळून पाहिल्याचे विशाल सांगतात. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमीच अफाट आदर अन् निष्ठा राहिली आहे.
लग्नाचा बंध अन् नवा प्रवास
वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर शुभांशु आणि कामना यांचे हे प्रेम लग्नाच्या बंधनात बांधले गेले. कुटुंबीयांच्या आशीर्वादाने दोघे एक झाले. आज त्यांना ६ वर्षांचा एक गोड मुलगा आहे.
निवृत्त अधिकारी असलेले वडील दयाल शुक्ला आणि गृहिणी असलेल्या आई आशा शुक्ला यांचे सर्वात लहान सुपुत्र शुभांशु यांनी आज जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
शुभांशु जेव्हा स्पेस स्टेशनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत होते, तेव्हा पृथ्वीवर बसून त्यांची सर्वात मोठी ताकद कामना याच बनून राहिल्या. त्यांचे पहिले प्रेम नेहमीच आकाश राहिले आहे, असे शुभांशु यांच्या सर्वात मोठ्या चाहती असलेल्या कामना अभिमानाने सांगतात.
ही कथा दोन व्यक्ती एकत्र येण्यापुरती मर्यादित नाही. ही कथा समर्पण, संयम अन् खऱ्या प्रेमाची मिसाल आहे. जिथे एक लाजाळू मुलगा अंतराळाच्या उंचीला स्पर्श करतो अन् त्याचे बालपणीचे प्रेम प्रत्येक पावलावर त्याची सर्वात मोठी ताकद बनून सोबत उभे राहते.