आफ्रिन जाबी : भारत-श्रीलंकेदरम्यानची पाकची सामुद्रधुनी पार करणारी जलपरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 24 m ago
आफ्रिन जाबी
आफ्रिन जाबी

 

शांतीप्रिय रॉय चौधरी

इंग्लिश चॅनल अन् पाकची सामुद्रधुनी पार करून लाटांवर राज्य करणाऱ्या एका २१ वर्षांच्या मुलीने आता थेट अमेरिकेच्या कॅटालिना चॅनलला आव्हान दिलंय. मेदिनीपूरची ही लेक आता सातासमुद्रापार भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झालीये.

पश्चिम मिदनापूरच्या मेदिनीपूर शहरात राहणारी आफ्रिन जाबी म्हणजे केवळ बंगालचीच नाही, तर संपूर्ण देशाची एक उगवती स्टार आहे. तिचं मूळ गाव खडकपूर-२ ब्लॉकमधील चौपिना. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने खुल्या समुद्रातील पोहण्यात असे काही पराक्रम केलेत, की भल्याभल्यांना तिचा हेवा वाटेल.

इंग्लिश चॅनल आणि भारत-श्रीलंकेदरम्यानची पाकची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केल्यानंतर, आता २२ सप्टेंबर रोजी ती कॅलिफोर्नियातील खडतर कॅटालिना चॅनल सर करण्यासाठी पाण्यात उतरणार आहे. २९ जुलै २०२५ रोजी तिने इंग्लिश चॅनलवर विजय मिळवला होता, तर याच वर्षी ९ मे रोजी पाकची सामुद्रधुनी पोहून पार केली होती.

यशोगाथेची सुरुवात: स्थानिक तलावांपासून राष्ट्रीय मंचापर्यंत
आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडझेप घेण्यापूर्वी आफ्रिनने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवून दिली होती. पश्चिम बंगालच्या वयोगट जलतरण स्पर्धेत तिने पदकांची कमाई केली. शालेय स्तरावरील स्पर्धा गाजवल्यानंतर तिने राष्ट्रीय ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये दोनदा बंगालचे प्रतिनिधित्व केले.

विद्यापीठाच्या स्तरावरही तिने आपला दबदबा कायम ठेवला. मेदिनीपूर कॉलेजमध्ये समाजशास्त्र विषयाचे शिक्षण घेताना, तिने विद्यासागर विद्यापीठाकडून ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धेत तब्बल तीनदा सहभाग नोंदवला.

नॅशनल स्कूल गेम्स आणि प्रतिष्ठित 'खेलो इंडिया' स्पर्धेतही तिने चमकदार कामगिरी करत पदके पटकावली. गंगेच्या पात्रात झालेल्या जगातील सर्वात लांब अशा ८१ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्विमिंग स्पर्धेत तिने महिला गटात दुसरा क्रमांक पटकावून सर्वांना थक्क केले होते. याशिवाय १३, २१ आणि २४ किलोमीटरचे अंतर तिने लीलया पार केले आहे.

क्रीडा अन् शिक्षणाचा सुंदर मेळ
जलतरणात यश मिळवत असताना आफ्रिनने शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. सध्या ती अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये शारीरिक शिक्षण विषयाचे उच्च शिक्षण घेत आहे. दिवस-रात्र चालणारा सरावाचा कडक दिनक्रम अन् दुसरीकडे कॉलेजचा अभ्यास... अशा दोन्ही आघाड्यांवर ही तरुणी तितक्याच जिद्दीने लढत आहे.

आर्थिक अडथळ्यांची लाट अन् वडिलांची साथ
आफ्रिनचा हा प्रवास दिसायला जेवढा भव्य वाटतो, तेवढाच तो संघर्षाने भरलेला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेल्या आफ्रिनचे वडील शेख पियार अली हे ट्रान्सपोर्टचा छोटा व्यवसाय करतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर एका चॅनलमध्ये पोहण्यासाठी तब्बल लाखो रुपयांचा खर्च येतो. मुलीचे शिक्षण अन् पोहण्याचा हा महागडा खर्च पेलताना या वडिलांची मोठी दमछाक होत आहे.

आपल्या संघर्षाबद्दल सांगताना पियार अली भावूक होऊन म्हणतात, "एकीकडे मुलीचे प्रशिक्षण थांबणार नाही याची काळजी घ्यायची असते, तर दुसरीकडे पैशांची जुळवाजुळव करावी लागते. छोट्या व्यवसायातून एवढा मोठा खर्च भागवणे आता कठीण होत चालले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मिळणारी मदत अपुरी पडतेय. सरकारने किंवा दानशूर लोकांनी थोडी मदत केली, तर मेदिनीपूरसारख्या लहान शहरात राहूनही माझी मुलगी सातासमुद्र पार करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल."

आफ्रिनचे वडील पियार अली आणि आई सबिना परवीन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. प्रसिद्ध 'कोणी' चित्रपटातील खिड्डा या प्रशिक्षकासारखे आपले वडीलच आपले खरे मार्गदर्शक असल्याचे आफ्रिन सांगते. समुद्राच्या अथांग लाटांशी झुंजताना वडिलांचा एकच आवाज तिच्या कानात घुमतो तो म्हणजे 'फाईट जाबी, टाईट.'

सात समुद्र पार करण्याचे स्वप्न
पश्चिम मिदनापूरची 'इलेक्शन आयकॉन' म्हणून गौरवण्यात आलेली आफ्रिन आता कॅटालिना चॅनल पार करण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. पण हे तिचे अंतिम ध्येय नाही.

आपल्या भविष्यातील स्वप्नाबद्दल बोलताना आफ्रिन आत्मविश्वासाने सांगते, "जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या सातही सामुद्रधुनी पार करून 'सेव्हन सीज' जिंकण्याचा जागतिक विक्रम रचणे हेच माझ्या आयुष्याचे मुख्य ध्येय आहे."

सातासमुद्रावर भारताचे नाव कोरणारी ही सुवर्णकन्या आता तिच्या पुढील मोठ्या मोहिमेसाठी निघत आहे. तिच्या या साहसासाठी संपूर्ण देश तिला शुभेच्छा देत आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter