शहीद हुमायूं भट यांच्या शौर्यास नमन, राष्ट्रपती पदकानंतर कीर्ती चक्र प्रदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
हुमायूं मुझम्मिल भट
हुमायूं मुझम्मिल भट

 

अझहर आलम 

काश्मीरच्या खोऱ्याने देशासाठी अनेक वीरपुत्र दिले आहेत. याच मातीत जन्मलेला, कठीण प्रसंगात प्रचंड धैर्याने दहशतवाद्यांना भिडणारा अन् देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारा एक तरुण अधिकारी म्हणजे हुमायूं मुझम्मिल भट! त्यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत कृतज्ञ राष्ट्राने त्यांना शांतता काळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च लष्करी सन्मान कीर्ती चक्र देऊन मरणोत्तर सन्मानित केले आहे.

अनंतनाग जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) म्हणून कार्यरत असताना, १३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या एका भीषण चकमकीत या वीराने लढा देता देता वीरमरण पत्करले.

अवघ्या ३२ वर्षांच्या वयात लश्कर-ए-तैयबाच्या कुख्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना हुमायूं यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांचा हा त्याग केवळ पोलिस दलासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी शौर्याची एक प्रेरणादायी कथा बनून राहिला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दुसरी पिढी कशी जीवाची बाजी लावते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हुमायूं भट!

पोलिस दलात रुजू अन् नेतृत्वाचा ठसा
२०१८ मध्ये जम्मू-काश्मीर पोलिस दलात रुजू झाल्यानंतर हुमायूं यांनी आपल्या उत्कृष्ट नेतृत्वगुणांमुळे अन् युद्धकौशल्यामुळे अत्यंत कमी वेळात सर्वांची मने जिंकली. त्यांच्या ५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी नेहमी पुढे राहून तुकडीचे नेतृत्व केले.

सहकारी अधिकारी त्यांना अत्यंत नम्र, तल्लख बुद्धिमत्तेचे अन् आधुनिक विचारसरणीचे अधिकारी म्हणून ओळखायचे. पोलिस दलात येण्यापूर्वी त्यांनी समाजकल्याण विभागातही काही काळ काम केले होते. परंतु खाकी वर्दी परिधान करून देशसेवा करणे, हेच त्यांच्या आयुष्याचे खरे ध्येय होते.

गडूलच्या जंगलातील ती भीषण चकमक
१३ सप्टेंबर २०२३ चा तो दिवस... अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरातील गडूल गावाच्या घनदाट जंगलात दहशतवादी लपल्याची पक्की बातमी मिळाली. लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर उझैर खान आणि त्याच्या साथीदारांचा खात्मा करण्यासाठी लष्कर अन् पोलिसांचे संयुक्त अभियान सुरू झाले.

जंगलात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक सुरक्षा दलांवर अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण चकमकीत हुमायूं यांच्या पोटाला गंभीर गोळी लागली.

पोटाला प्राणघातक दुखापत झालेली असतानाही त्यांनी अत्यंत संयमाने आपल्या वडिलांना फोन केला. अवघ्या १३ सेकंदांच्या या शेवटच्या संवादात ते म्हणाले, "पप्पा, मला गोळी लागलीय. पोटाला गोळी लागलीय. कृपया अजिबात घाबरू नका..."

त्यानंतर आपल्या पत्नीला केलेला शेवटचा मेसेजही तितकाच भावूक करणारा होता, "मला माफ कर... आणि आशरची काळजी घे!"

त्यांना तातडीने उपचारासाठी श्रीनगरच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोंचक आणि शिपाया प्रदीप सिंग या तीन वीरांनाही वीरमरण आले. बडगाममध्ये झालेल्या हुमायूं यांच्या अंत्ययात्रेला हजारो नागरिकांनी अन् वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या शूरवीराला अश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला.
दोन पिढ्यांची देशसेवेची परंपरा
हुमायूं यांच्या कुटुंबाला देशसेवेचा आणि पोलिस दलाचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील गुलाम हसन भट हे स्वतः पोलिस निरीक्षक जनरल (IGP) म्हणून ३४ वर्षे देशसेवा करून जून २०२३ मध्येच निवृत्त झाले होते.

वडिलांच्या निवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यांतच मुलाच्या हौतात्म्याची बातमी कुटुंबावर धडकली. त्यांची आई हलीमा भट यांनी नेहमीच मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले. भाऊ डॉ. हनान भट (पशू वैद्यकीय अधिकारी) आणि बहीण असा या कुटुंबाचा सुखी परिवार होता.

२०२२ मध्ये हुमायूं यांचा विवाह काश्मीर विद्यापीठात कार्यरत असलेल्या फातिमा अली यांच्याशी झाला. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्या घरात लहानग्या 'आशर'चे आगमन झाले. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही आठवड्यांतच हुमायूं यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

कीर्ती चक्र अन् मरणोत्तर सन्मान
स्वातंत्र्यदिन २०२४ च्या पूर्वसंध्येला हुमायूं मुझम्मिल भट यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान केले. याशिवाय २०२१ मधील श्रीनगर मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिन २०२५ रोजी त्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एप्रिल २०२५ मध्ये त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली अन् सांत्वन केले.

पतीच्या जाण्याने डोंगराएवढे दुःख पाठीशी असतानाही, पत्नी फातिमा यांनी आपल्या मुलाला हुमायूं यांच्यासारख्याच स्वाभिमानाने अन् देशभक्तीच्या संस्कारांत घडवण्याचा संकल्प सोडला आहे. काश्मीरच्या मातीत शांततेचे रोपटे लावण्यासाठी हुमायूं भट यांनी दिलेले हे बलिदान येणाऱ्या अनेक पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter