भक्ती चाळक
पाण्याचा प्रचंड लोट, डोळ्यांसमोर वाहून जाणारी घरे, रस्त्यांवर साचलेले पाणी अन् जिवाच्या आकांताने सुरक्षित जागा शोधणारी माणसे... सध्या सोशल मीडियावर येणारे आसामच्या महापुराचे व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहण्याचे असीम दुःख सध्या आसाम अनुभवत आहे.
शेकडो कुटुंबांची स्वप्ने, मोडणारा संसार अन् आयुष्यभराची पुंजी पुराच्या पाण्याच्या वाहून गेली आहे. निसर्गाच्या या भयंकर कोपापुढे संकटात सापडलेल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सध्या मोठी गरज आहे. अशा कठीण प्रसंगी 'जमियत उलमा-ए-हिंद' या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे.
जमीयत उलेमा-ए-हिंदने नेहमीच संकटकाळात मदतीचा हात दिला आहे.ही भारतातील अग्रगण्य इस्लामी संघटना आहे. १९१९ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आजही ती मुस्लिम समुदायाच्या हक्कांसाठी आणि समाजकार्यासाठी पुढाकार घेते. मौलाना महमूद मदनी यांच्या नेतृत्वाखाली जमीयत उलेमा-ए-हिंदने सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांवर भर दिला आहे.
आसाममधील जलप्रलयाचे भयानक वास्तव
आसाममधील परिस्थिती दिवसागणिक अधिकच बिकट होत चालली आहे. पुराऱ्या भीषण परिस्थितीविषयी बोलताना जमियत उलमा-ए-महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना हलीम उल्लाह काझमी दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, "या वेळी देशाची रियासत आसामचा एक मोठा हिस्सा भयंकर पुराच्या विळख्यात आहे. आसाम सरकारच्या अहवालानुसार, १८ जिल्ह्यांमधले ७ लाख २१ हजार नागरिक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. २,७०० गावे पुराच्या तडाख्यात आली आहेत. १०० च्या जवळपास लोक मृत पावले आहेत आणि ४० व्यक्ती बेपत्ता आहेत. दररोज मृत पावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे."
जमियतची देशव्यापी हाक अन् महाराष्ट्राचा प्रतिसाद
आसाममधील या भीषण जलप्रलयाची गंभीर दखल घेत 'जमियत उलमा-ए-हिंद'चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद अर्शद मदनी यांनी देशभरातील सर्व प्रांतीय संघटनांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण देशातून आणि विशेषतः महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
महाराष्ट्रातून पूरग्रस्तांसाठी धान्य, कपडे, औषधे आणि आर्थिक मदत गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. महाराष्ट्रभरातून या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जमियत उलमा-ए-महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना हलीम उल्लाह काझमी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना या मोहिमेत हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मौलाना काझमी म्हणतात, "जमियत उलमा-ए-महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र करत आहे. या संकटसमयी जास्तीत जास्त लोकांनी सढळ हाताने पुढे यावे आणि पीडितांना आधार द्यावा. सर्वांनी आपापल्या परिसरात मदत गोळा करून ती जमियत उलमा-ए-महाराष्ट्रच्या कार्यालयात जमा करावी किंवा जाहीर करण्यात आलेल्या बँक खात्यावर थेट रक्कम वर्ग करावी."
ते पुढे म्हणाले की, "संकटसमयी जात, धर्म किंवा पंथ असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत करण्याची जमियतची परंपरा राहिलेली आहे. आज पुन्हा एकदा आपण सर्वांनी एकत्र येण्याची, हीच परंपरा जपण्याची आणि या मदतकार्यात हिरिरीने सहभागी होण्याची वेळ आली आहे."
आज आसामला अन्न, स्वच्छ पाणी, निवारा आणि औषधांची अत्यंत तातडीने गरज आहे. एका छोट्याशा मदतीमुळे तिथे एखाद्या निष्पाप जिवाचे प्राण वाचू शकतात, एखाद्या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्याची उमेद मिळू शकते. महाराष्ट्राने नेहमीच देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीत दातृत्वाचा आदर्श घालून दिला आहे. जमियत उलमा-ए-हिंदने सुरू केलेल्या या अभियानात प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून माणुसकीचा हा दिवा तेवत ठेवावा, हीच काळाची गरज आहे.