गुवाहाटी
आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर असून, गेल्या २४ तासांत आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने या वर्षीच्या पुरातील मृतांचा आकडा १०० वर पोहोचला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) जारी केलेल्या बुलेटिननुसार, गोलाघाट आणि कार्बी आंगलोंग जिल्ह्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
सध्या आसाममधील चराईदेव, दरंग, गोलाघाट, जोरहाट, कार्बी आंगलोंग, नागाव आणि शिवसागर या सात जिल्ह्यांमधील १ लाख ३७ हजार ५०० हून अधिक नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. गोलाघाट जिल्ह्यात सर्वाधिक ७० हजार, शिवसागरमध्ये ४० हजार आणि जोरहाटमध्ये १६ हजारांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली असली, तरी ४५६ गावे अजूनही पाण्याखाली आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून ६ जिल्ह्यांत १२५ मदत छावण्या आणि वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, जिथे ४९ हजार ६१ नागरिक आश्रय घेत आहेत. बाधित नागरिकांसाठी तांदूळ, डाळ, तेल आणि मिठाचे वाटप तीव्र करण्यात आले आहे. दरम्यान, गोलाघाट आणि नुमालीगड येथील धनसिरी नदी तसेच श्रीभूमी येथील कुशियारा नदी अद्यापही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरामुळे जवळपास ११ हजार ९३३ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून हजारो मुके प्राणिही बाधित झाले आहेत.