गुरुग्राम
गुरुग्राममध्ये प्रतिबंधित आणि अतिविषारी 'सल्फास' (Sulfas) ऑनलाइन मागवून त्याचे सेवन केल्यामुळे १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि त्याच्या एका विक्रेत्याविरुद्ध (seller) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने ऑनलाइन खरेदीमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तिकली गावातील निवासी अनुराधा मेहरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा १७ वर्षीय मुलगा उवी याने अलीकडेच १२ वीची परीक्षा दिली होती. २८ एप्रिल रोजी त्याने हे विषारी रसायन प्राशन केले, ज्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर अनुराधा यांनी जेव्हा त्याचा मोबाईल फोन तपासला, तेव्हा उवीने ११ एप्रिल रोजी 'मीशो' (Meesho) या ऑनलाइन ॲपवरून 'सल्फास' मागवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रतिबंधित पदार्थाच्या विक्रीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
प्राथमिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाच्या आदेशानुसार बादशहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि २८६ (विषारी पदार्थांसंदर्भात निष्काळजी कृती) अंतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या मते, सुरत येथील एका व्यक्तीच्या नावाचा वापर करून हा प्रतिबंधित पदार्थ मागवण्यात आला होता. या बिलावर गुजरातच्या सुरत येथील 'एव्हरग्रीन ॲग्रो अँड गार्डनिंग मॉल' चालवणारे पंकज भारतभाई परमार यांचे नाव नमूद आहे. पोलीस आता या ऑनलाइन विक्री प्रक्रियेची आणि संबंधित विक्रेत्याच्या भूमिकेची सखोल चौकशी करत असून, लवकरच कंपनीच्या प्रतिनिधींचीही चौकशी केली जाणार आहे.