हिंजवडीत IT इंजिनिअर्सनी मांडली 'मोहब्बत की दुकान'

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
'मोहब्बत का शरबत' वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी हिंजवडीतील आयटीयन्स
'मोहब्बत का शरबत' वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी हिंजवडीतील आयटीयन्स

 

भक्ती चाळक

पुण्यातील हिंजवडी हा परिसर आयटी हब म्हणून ओळखला जातो. आता याच परिसरात नुकताच एक अत्यंत प्रभावी उपक्रम राबवला गेलाय. आजच्या काळात जेव्हा समाज माध्यमांवर आणि राजकारणात धार्मिक तसेच जातीय द्वेषाचे वारे वाहत असताना हिंजवडीतील काही समविचारी आयटीयन्सनी एकत्र येत 'मोहब्बत का शरबत' वाटपाचा कार्यक्रम राबवला आहे. गुढीपाडवा आणि रमजान ईद या दोन्ही सणांचे औचित्य साधून सामाजिक सलोखा आणि प्रेमाचा संदेश देणारा हा उपक्रम होता.

हिंजवडी फेज ३ परिसरात हजारो तरुण-तरुणी आपल्या लॅपटॉप बॅग्स खांद्यावर टाकून करिअरच्या शर्यतीत धावत असतात. आणि अशाच ठिकाणी या तरुणांनी आपला 'मोहब्बत का शरबत'चा स्टॉल लावला. या उपक्रमाची संकल्पना सर्वप्रथमअजिंक्य देसाई यांनी आपल्या मित्रमंडळींजवळ मांडली. 

यामागची भावना सांगताना अजिंक्य म्हणाले की, "आम्ही काही मित्र सहज चहासाठी भेटलो होतो. समाजात काय चाललंय यावर चर्चा सुरू असतानाच डोक्यात आलं की, आपण समाजात सकारात्मकता पसरवण्यासाठी काहीतरी उपक्रम राबवू शकतो. गुढीपाडवा आणि ईद एकापाठोपाठ येत होते. एकत्रित सण साजरा करणं, एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं हीच आपली खरी परंपरा आहे, हे लोकांना सांगायचं होतं. त्यातूनच 'मोहब्बत का शरबत' ही कल्पना सुचली.”

विशेष म्हणजे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य यांच्या कुटुंबानेही साथ दिली. त्यांच्या आई आणि बहीण यांनी सरबत बनवण्यासाठी मदत केली. त्यांच्या पत्नी नीलिमा यांनी या उपक्रमाचे तांत्रिक आणि बॅनर डिझाइनचे काम तर चोखपणे सांभाळलेच पण त्यांनी प्रत्यक्षात मैदानात उतरून देखील आपला सहभाग नोंदवला. 

आयटीमध्ये काम करणारा हा तरुण वर्ग सहसा सामाजिक चळवळींपासून दूर असतो, असा एक समज आहे. पण या मित्रांनी मिळून तो मोडीत काढला. अजिंक्य म्हणतात, "आपल्या आजूबाजूला आपल्यासारखा विचार करणारा खूप मोठा वर्ग आहे, पण सगळे विखुरलेले आहोत. त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. आणि अशाच उपक्रमांच्या माध्यमातून हे लोक जोडले जाऊ शकतात."

प्रत्यक्ष सरबत वाटताना या तरुणांना मानाला समाधान देणारे अनुभव आले. दीड-दोन तासात सरबतचे २५० हून अधिक ग्लास संपले. लोक केवळ सरबत पिऊन पुढे जात नव्हते, तर तिथे थांबून चर्चादेखील करत होते. या स्टॉलला भेट देणारे केवळ महाराष्ट्रातीलच लोक नव्हते तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यांतील लोक तिथे आले आणि त्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. लोकांना जेव्हा समजले की, हे काम कोणा राजकीय पक्षाचे नसून आयटी इंजिनिअर्सचे आहे, तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित झाला. 

तिथे भेटलेल्या मुळच्या जुन्नरच्या एका ५० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, "आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, पण महाराजांचे खरे विचार यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. आजच्या तरुणांना हे खरे विचार सांगण्याची गरज आहे. आणि तुमच्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत हे विचार पोहचू शकतात."

या उपक्रमात सहभागी झालेला ऋषिकेश पवार हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतो, "सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की लोक येतील का, त्यांचा प्रतिसाद कसा असेल? पण लोकांचा उत्साह बघून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं. राजकारणात उतरून बदल घडवणं सर्वांना शक्य नसतं, पण एक सांस्कृतिक चळवळ उभी करणं गरजेचं आहे.'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान' चालवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे."

या उपक्रमात पहिल्यांदाच सहभागी झालेले काही तरुण सुरुवातीला थोडे साशंक होते, पण लोकांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढला. हे तरुण आता एवढ्यातच थांबणार नाहीये. येणाऱ्या काळात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयटी पार्कमध्ये जनजागृती करण्याचा त्यांचा मानस आहे. 

शेवटी अजिंक्य देसाई यांनी व्यक्त केलेला विचार खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, "आपल्याला भारताची जी मूळ ओळख माहिती आहे, ती शांतता आणि प्रेमाची आहे. काही समाजकंटक त्यांच्या फायद्यासाठी द्वेष पसरवत असले तरी, आपण प्रेमाचा संदेश देणारे लोक शांत राहिलो तर पुढच्या पिढीपर्यंत आपला खरा भारतीय विचार पोहोचणारच नाही. आपला विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण बोलत राहिलं पाहिजे आणि असे उपक्रम करत राहिले पाहिजे." समाजात द्वेष पसरवणारे हजारो लोक असले तरी यासारखे उपक्रम राबवणारे मुठभर लोक त्या सर्वांना पुरून उरतात. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter