AYUSHMAN YOJNA SCAM: महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजनांमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याची SIT चौकशी सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 14 h ago
मुंबईत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन
मुंबईत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन

 

मुंबई

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्राथमिक छाननीदरम्यान महाराष्ट्रात तब्बल १५ हजार ४०७ संशयास्पद आरोग्य विमा दावे (Health Insurance Claims) उघडकीस आले आहेत. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवार जारी केलेल्या शासन निर्णयानुसार (GR), हे कथित गैरप्रकार २०२४ ते २०२६ या कालावधीत दाखल केलेल्या दाव्यांशी संबंधित आहेत. याआधी राज्य सरकारने सर्व १५ हजार ४०७ प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा घोटाळा अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेला असल्याचा संशय आल्यामुळे SIT स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एसआयटीची व्याप्ती आणि तपास कार्य

नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडम हे या एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत, तर सार्वजनिक आरोग्य विभागातील एमजेपीजेवायचे उपसचिव सदस्य सचिव असणार आहेत. गरज भासल्यास वैद्यकीय शिक्षण विभाग तज्ज्ञ डॉक्टर पुरवणार आहे. रुग्णालयास्तरावरील अनियमितता, बनावट किंवा वैद्यकीयदृष्ट्या अनावश्यक दावे, उपचारांचे फुगवलेले बिल, अनधिकृत मध्यस्थांचा सहभाग आणि एकाच मोबाईल क्रमांकाशी जोडलेली मोठ्या प्रमाणातील नोंदणी यांची एसआयटी चौकशी करणार आहे.

या दोन्ही आरोग्य विमा योजनांमधील त्रुटी शोधून तांत्रिक दोषांवर मात करण्यासाठी सुधारणात्मक शिफारसी करण्याचे काम हे पथक करणार आहे. एसआयटीला स्थापनेपासून ३० दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.