नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुकवरील पोस्ट रिस्ट्रिक्ट केल्याप्रकरणी केंद्र सरकारने समन्स बजावलेली मेटा (Meta) कंपनीची जागतिक टीम पुढील आठवड्याच्या मध्यात भारतात येणार असून त्यांना अल्गोरिदम बायस (algorithmic bias) आणि सार्वजनिक सुव्यवस्थेतील भूमिकेबाबत धारेवर धरले जाणार आहे, असे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, मेटाच्या ग्लोबल टीमला त्यांच्या अल्गोरिदमच्या कार्यपद्धतीबाबत आणि सार्वजनिक सुव्यवस्थेतील भूमिकेबाबत स्पष्टीकरण मागितले जाईल. तसेच ही टीम एका संसदीय समितीसमोरही हजर राहणार आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना संबोधित केलेली आणि पेपर लीकविरोधी कठोर उपायांची हमी देणारी पोस्ट फेसबुकवर थोड्या काळासाठी रिस्ट्रिक्ट करण्यात आली होती. अमेरिकेतील या सोशल मीडिया जायंटने या प्रकाराला तांत्रिक बिघाड असल्याचे म्हणत माफी मागितली असली, तरी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) हे स्पष्टीकरण अपुरे असल्याचे मानले होते.
या प्रकरणानंतर, मेटाने आयटी मंत्रालयाला कळवले होते की, पंतप्रधान आणि काही प्रमुख खात्यांवरील पोस्टवर आता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावरील अनेक तपासण्यांसह अतिरिक्त देखरेख ठेवली जाईल. दरम्यान, पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणाऱ्या मॉर्पिंग आणि एआय पोस्ट्सप्रकरणी हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत. नियम आणि कायद्यांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर उत्तरदायित्व निश्चित केले जाईल, असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.