ग्लासगो
राष्ट्रकुल खेळ २०२६ च्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत नवा इतिहास रचला आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये भारतीय मुष्टीयोध्यांनी विक्रमी ७ सुवर्ण पदके पटकावली, तर ज्युदो आणि पॅरा ॲथलेटिक्समध्येही भारताने नेत्रदीपक यश मिळवले. या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने पदकतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
बॉक्सिंग प्रकारात भारताने सर्वोत्तम प्रदर्शन केले. महिला मुष्टीयोड्यांनी ५ सुवर्ण पदके जिंकली, ज्यात जागतिक चॅम्पियन जैस्मिन लंबोरिया (५७ किलो), प्रीती पवार (५४ किलो), प्रिया गंगास (६० किलो), साक्षी चौधरी (५१ किलो) आणि अरुंधती चौधरी (७० किलो) यांचा समावेश आहे. ऑलिम्पिक पदकविजेती लव्हिना बोरगोहेन (-७५ किलो) हिला रौप्य पदकावर समाधान मानवावे लागले. पुरुष गटात सचिन सिवाच (-६० किलो) आणि अंकुश पांघल (-७० किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले, तर जदुमनी सिंह (-५५ किलो) आणि नरेरेंद्र बेरवाल (+९० किलो) यांनी रौप्य पदके पटकावली.
ज्युदोमध्ये उन्नती शर्मा हिने ६३ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. यापूर्वी हर्ष सिंग आणि अस्मिता डे यांनी सुवर्ण पदके जिंकत इतिहास रचला होता. पॅरा ॲथलेटिक्समध्ये सोमन राणाने पुरुष एफ५७ शॉट पुट प्रकारात सुवर्ण, तर शुभम जुयलने रौप्य पदक जिंकले. गुल्वीर सिंगने ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक जिंकत एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट ठरण्याचा मान मिळवला. तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेलने रौप्य आणि सेल्वा प्रभू थिरुमारनने कांस्य पदक जिंकले. पॅरा खेळाडूंनी एकूण ७ पदके जिंकत भारताची मान उंचावली आहे.