Ind Vs Pak Hockey World Cup 2026: भारताने पाकिस्तानला ५-३ गोलने चारली धूळ, हरमनप्रीत सिंग चमकला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; हॉकी विश्वचषकात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताची बाजी
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; हॉकी विश्वचषकात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताची बाजी

 

आम्सटेलवीन

एफआयएच (FIH) पुरुष हॉकी विश्वचषकाच्या पूल 'डी' मधील शेवटच्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-३ असा पराभव केला आहे. या अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यात भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी दोन गोल करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयामुळे भारतीय संघाने जागतिक स्पर्धेत आपली पकड आणखी मजबूत केली आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ५ व्या आणि २१ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, तर अभिषेकने ११ व्या आणि २४ व्या मिनिटाला उत्कृष्ट मैदानी (field goals) गोल करत भारताची पकड मजबूत केली. याशिवाय उपकर्णधार हरदिल सिंगने ३५ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकद्वारे एक गोल नोंदवला. पाकिस्तानकडून हनान शाहीदने दोन आणि सुफियान खानने एक गोल करत अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या मजबूत बचावापुढे त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही.