शबाना फैझल : ‘फैझल अँड शबाना फाउंडेशन’च्या सर्वेसर्वा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
शबाना फैझल
शबाना फैझल

 

अर्सला खान

व्यावसायिक जगतात स्वतःची एक वेगळी अन् भक्कम ओळख निर्माण करणाऱ्या मोजक्या महिलांमध्ये शबाना फैझल यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सिंगापूरमधील प्रसिद्ध 'केईएफ होल्डिंग्स' (KEF Holdings) च्या त्या सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष आहेत. व्यावसायिक यश मिळवण्यासोबतच 'फैझल अँड शबाना फाउंडेशन'च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य अन् समाजसेवेच्या क्षेत्रात त्या मोलाचे योगदान देत आहेत.

शबाना फैझल यांचे पती फैझल ई. कोटिकोलोन हे 'केईएफ होल्डिंग्स'चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. ही कंपनी पायाभूत सुविधा, शिक्षण, शेती, धातू आणि गुंतवणूक अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामाच्या नव्या अन् प्रगत पद्धती विकसित करणे हे या कंपनीचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते.

स्क्रॅप मेटलच्या छोट्या व्यवसायापासून सुरुवात
आज अब्जावधींचे साम्राज्य असलेल्या या कंपनीची सुरुवात १९९५ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये अगदी लहान स्वरूपात झाली होती. सुरुवातीला स्क्रॅप मेटल ट्रेडिंग आणि रीसायकलिंगचा एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यात आला. मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर हा व्यवसाय हळूहळू वाढत गेला आणि कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रांत पाय पसरले.

आज हा समूह जगभरात एक मोठा बिझनेस ग्रुप म्हणून ओळखला जातो. व्यवसायाचा विस्तार करत असतानाच या समूहाने सामाजिक जबाबदारीचे भानही तितक्याच निष्ठेने जपले आहे. २०१४ मध्ये 'केईएफ होल्डिंग्स'ने भारतातील आपल्या विविध प्रकल्पांमध्ये तब्बल १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.
 

पुरुषप्रधान क्षेत्रातही कोरले स्वतःचे नाव
शबाना फैझल यांचा करिअरचा प्रवासही अतिशय रंजक अन् वेगळा राहिला आहे. ज्या काळात स्टील मिल किंवा धातू उद्योगात महिलांचे प्रमाण नगण्य होते, त्या काळात त्यांनी स्टील मिलमध्ये प्रत्यक्ष काम केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

मँगलोर येथील सेंट एग्नेस कॉलेजमधून त्यांनी मानसशास्त्र (सायकोलॉजी) विषयात पदवी पूर्ण केली. त्यानंतर दुबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइन (NIFT) मधून फॅशन डिझायनिंग आणि मर्चेंडायझिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. लग्नानंतर चार मुलांचे संगोपन करत असताना त्यांनी स्वतःच्या आवडी अन् स्वप्नांना कधीही तडा जाऊ दिला नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात कायम होती.

पतीच्या व्यवसायात सक्रिय सहभाग अन् कर्मचाऱ्यांचे कल्याण
जेव्हा 'केईएफ होल्डिंग्स'ने शारजाहमध्ये एक भव्य मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी सुरू केली, तेव्हा शबाना यांनी तिथल्या इंटीरियर डिझायनिंगचे काम स्वतःच्या हातात घेतले. इथूनच त्यांचा पतीच्या व्यवसायातील सक्रिय प्रवास सुरू झाला.

यानंतर त्यांनी कंपनीच्या मानव संसाधन (HR) विभागाला बळकटी देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कोणत्याही कंपनीची सर्वात मोठी ताकद तिथे काम करणारे कर्मचारी असतात, असा त्यांचा ठाम विश्वास होता.

त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक अद्ययावत कम्युनिटी सेंटर उभारले. कार्यशाळेत काम करणारा मजूर असो वा मोठ्या पदावरील अधिकारी, सर्वांसाठी जेवण आणि इतर सुविधांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नसे. कर्मचाऱ्यांना नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासोबतच इंग्रजी संभाषण, आरोग्य आणि स्वच्छतेविषयी विशेष धडे दिले जात असत.
 

समाजकार्याला बनवले आयुष्याचा भाग
समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे आणि ज्यांच्यात क्षमता आहे त्यांनी समाजासाठी पुढे आलेच पाहिजे, ही शबाना यांची सुरुवातीपासूनची विचारसरणी होती. याच विचारातून त्यांनी आपल्या कुटुंबासह समाजकार्याचा श्रीगणेशा केला.

'फैझल अँड शबाना फाउंडेशन'च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि गरजूंच्या मदतीसाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आले. केरळमधील माहे येथील 'के. ई. सफिया ऑटिझम सेंटर'ला आर्थिक मदत देणे असो वा कोझिकोडे येथील नदक्कावुमधील सरकारी मुलींच्या शाळेचा कायापालट करणे असो, त्यांनी नेहमीच गरजू घटकांना प्राधान्य दिले.

सरकारी शाळेचा ऐतिहासिक कायापालट
जेव्हा शबाना आणि त्यांच्या टीमने नदक्कावु येथील सरकारी शाळेचे काम हाती घेतले, तेव्हा तिथली परिस्थिती अत्यंत वाईट होती. स्वच्छ शौचालये, प्रयोगशाळा अन् मुलभूत सुविधांचा तिथे मोठा अभाव होता.

सुमारे २,००० विद्यार्थिनी शिकत असलेल्या या शाळेत त्या वेळी अवघी ९ शौचालये चालू स्थितीत होती. फाउंडेशनने पुढाकार घेऊन संपूर्ण इमारतीची डागडुजी केली, नवीन सुविधा उभारल्या अन् शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. या बदलाचा सकारात्मक परिणाम लगेच दिसून आला. शाळेतील मुलींची उपस्थिती वाढली आणि परीक्षेच्या निकालातही मोठी सुधारणा झाली.

भारतातील प्रत्येक भागाची गरज वेगळी आहे, त्यामुळे एकाच मॉडेलवर संपूर्ण देशात काम होऊ शकत नाही, असे शबाना मानतात. पण सरकार, खाजगी कंपन्या आणि स्थानिक नागरिक एकत्र आले, तर शिक्षण क्षेत्रात खूप मोठी क्रांती घडवता येऊ शकते, असा विश्वास त्या व्यक्त करतात.

शबाना फैझल सांगतात, "समाजाला काहीतरी परत देण्याची भावना आमच्या मनात नेहमीच राहिली आहे. आपण आपल्या लोकांविषयी आणि समाजाविषयी आपुलकी बाळगली पाहिजे. हेच काम मला सर्वात जास्त समाधान देते. आयुष्य आव्हानांनी भरलेले असते अन् ते तसेच राहणार. त्यामुळे बदलाची सुरुवात आपल्यालाच कुठूनतरी करावी लागेल, नाही का?"

समाजकार्याच्या सुरुवातीला शबाना यांना लोकांच्या अविश्वासाचा आणि संशयाचा सामना करावा लागला. पण जेव्हा लोकांना चांगल्या कामाचे प्रत्यक्ष निकाल दिसू लागतात, तेव्हा त्यांचा विश्वास आपोआप वाढतो, असा त्यांचा अनुभव आहे.

देशाच्या प्रगतीसाठी सरकार आणि खाजगी क्षेत्राने एकत्र येऊन काम करायला हवे. त्यांच्या फाउंडेशनने केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच मदत केली नाही, तर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) आणि अल्झायमरसारख्या गंभीर आजारांवरील वैद्यकीय संशोधनालाही मोठे आर्थिक सहकार्य दिले आहे.

महिलांसाठी एक प्रेरणादायी आदर्श
कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी शबाना फैझल यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. कौटुंबिक आघाडी लिलया सांभाळत त्यांनी उद्योग जगतात स्वतःची जागा निर्माण केली आणि समाजकार्यातही एक नवा वस्तुपाठ घालून दिला.

त्यांच्या मते, यश म्हणजे केवळ मोठा व्यवसाय उभा करणे नव्हे, तर तुमच्या मेहनतीमुळे इतरांचे आयुष्य किती सुकर झाले, यावरून खरे यश मोजले जाते. व्यवसाय आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालवू शकतो, हेच शबाना फैझल यांच्या या प्रवासाने सिद्ध करून दाखवले आहे!

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter