PAPER LEAK PROTEST: झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन तीव्र; ५ जण आमरण उपोषणावर, मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 h ago
रांचीमध्ये परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात निदर्शने करताना विद्यार्थी.
रांचीमध्ये परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात निदर्शने करताना विद्यार्थी.

 

रांची 

झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपर लीकविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून पाच विद्यार्थी आमरण उपोषणावर बसले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पेपर लीक ही राष्ट्रीय समस्या असल्याचे म्हणत विद्यार्थ्यांशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे.

रांचितील जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर २५ जुलैपासून जेपीएससी-जेएसएससी रिफॉर्म्स मंचाच्या बॅनरखाली हे आंदोलन सुरू आहे. आंदोलक १४ व्या जेपीएससी नागरी सेवा परीक्षेची परीक्षा रद्द करण्याची आणि सीआयडी किंवा उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिलांसह पाच जण झारखंड लोकक्रांतिकारी मोर्चाचे नेते देवेंद्रनाथ महतो यांच्यासोबत उपोषणात सामील झाले आहेत. महतो यांची प्रकृती खालावल्याने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी फोन करून त्यांना पाणी पिण्याचे आवाहन केले, त्यानंतर त्यांनी उपोषण सुरू ठेवत पाणी पिण्यास संमती दिली.

प्रशासनाकडून चर्चेचा प्रस्ताव आणि राजकारण तापले

आंदोलकांच्या वाढत्या दबावानंतर रांचीचे उपविभागीय अधिकारी आणि अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाच सदस्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी आमंत्रित केले. मात्र, ही चर्चा बंद खोलीत नको तर थेट सार्वजनिक ठिकाणी किंवा लाईव्ह टेलिकास्ट करावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक्स (X) वर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार गंभीर असल्याचे सांगितले आणि कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणावरून विरोधी पक्षातील भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, सीआयडीने आतापर्यंत १९ जणांना अटक केली असून माजी जेपीएससी अध्यक्षांचीही चौकशी सुरू आहे. विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी सुरक्षा लक्षात घेता परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.