गणेशोत्सवातील सलोख्याचे प्रदेश...

Story by  छाया काविरे | Published by  Chhaya Kavire • 2 Months ago
इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती बनवणारा धुळ्यातील रिज़वान, गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम, गणरायाच्या पूजेसाठी हळदी-कुंकू विकणारा कय्यूम अत्तार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गणपतीची आरती करताना मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलीम शेख व इतर कर्मचारी.
इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती बनवणारा धुळ्यातील रिज़वान, गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम, गणरायाच्या पूजेसाठी हळदी-कुंकू विकणारा कय्यूम अत्तार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गणपतीची आरती करताना मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलीम शेख व इतर कर्मचारी.

 

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत दरवर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर गणेशभक्त पुढच्या वर्षाची वाट लगेचच पाहू लागतात. गणेशचतुर्थीच्या सणाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. दहा दिवस चालणारा या गणेशोत्सवाची काल (ता. २८ सप्टेंबर) गणेशविसर्जनाने सांगता झाली. या वर्षीच्या गणेशोत्सवात सलोख्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्या घटनांचे प्रमाण हल्ली वाढताना दिसत असले तरी एकमेकांच्या धर्माविषयी आदर आणि प्रेम असलेल्यांची संख्याही समाजात कायमच जास्त राहिलेली आहे. ही मंडळी आपल्या कृतीतून कळत-नकळतपणे धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवत असतात. याचीच उदाहरणे गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रभर पाहायला मिळाली. त्यांविषयी...  

धुळ्यातील रिज़वानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!  
कासारे (ता. साक्री, जि. धुळे) येथे ‘बहु-उद्देशीय माध्यमिक विद्यालया’त गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी (शनिवार, ता. १६ सप्टेंबर) ‘इकोफ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सातवीचा विद्यार्थी रिज़वान राजू पिंजारी यानेही भाग घेतला. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेला रिज़वान हा या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरला. त्याने श्रीगणेशाची सुबक मूर्ती साकारली. धर्माधर्मात भेद करणाऱ्या, अन्य धर्मांचा द्वेष करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांना त्याच्या या निरागसतेतून आदर्शवत् अशा ऐक्याचा, सलोख्याचा संदेशच मिळाला आहे.
 
एकीकडे समाजातील काही घटक जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसतात, तर दुसरीकडे रिज़वानसारखी निरागस लहान मुले अशा कौतुकास्पद कृतीतून गुण्यागोविंदाने, एकोप्याने नांदण्याचा संदेश सर्व धर्मांना देत असतात. या वेळी भारावून गेलेला रिज़वान म्हणाला, ‘‘मला प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्याची आवड आहे, हौस आहे. जेव्हा सरांनी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्याची स्पर्धा जाहीर केली तेव्हा मी तीत स्वतःहून सहभागी झालो. त्यासाठी माझ्या आईनेही उत्सुकता दाखवली आणि शाळेनेही मला सन्मानपूर्वक संधी दिली. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो.’’

याविषयी बोलताना आर. एम. देसले हे शिक्षक म्हणाले, ‘‘इकोफ्रेंडली श्रीगणेशमूर्ती साकारण्यासाठी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले होते. सातवीतील रिज़वान पिंजारी याने थोडे घाबरतच ‘स्पर्धेत मी भाग घेतला तर चालेल का?’ अशी विचारणा केली. शिक्षक या नात्याने सर्व विद्यार्थी आम्हाला सारखेच असतात, त्यामुळे रिज़वानला आम्ही लागलीच होकार दिला. त्याच्या आईचाही फोन आला. त्या म्हणाल्या, ‘सर, माझ्या रिज़वानलाही अशा उपक्रमांमध्ये भाग घ्यायची आवड आहे. गणेशमूर्ती साकारण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा असं तोही म्हणतोय.’ मग आम्हा शिक्षकांनाही ही भूमिका स्वागतार्ह वाटली.
 
या स्पर्धेमुळे रिज़वानमधील कलागुणांना वाव मिळाला याचे आम्हाला समाधान आहे.’’ स्पर्धेच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील, सचिव ॲड. विश्वस्त एस. जे. भामरे, तसेच शालेय समितीचे अध्यक्ष संजय देसले यांनी शाळेला भेट दिली. त्यांनीही पुढाकार घेत रिज़वान याला बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली.

गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम
नाशिकमध्ये राहणारा अस्लम सय्यद हा विवाहसोहळे, तसेच राजकीय-सामाजिक-शासकीय कार्यक्रम यांमध्ये मान्यवरांना फेटे बांधण्याचे काम करतो. त्याच्या कुटुंबातील चार भाऊ आणि वडील असे पाच जण गेल्या अनेक वर्षांपासून फेटे बांधण्याचे काम करत आहेत. या व्यवसायातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तीन वर्षांपूर्वी अस्लमच्या एका मित्राने गणेशोत्सवात बाप्पाची स्थापना करण्यासाठी डोंगरी मैदान येथे मूर्ती खरेदी केली. ‘त्या मूर्तीला फेटा बांधून दे,’ असे त्या मित्राने अस्लम याला सांगितले. काही मिनिटांतच अस्लमने मूर्तीला आकर्षक फेटा बांधला. त्याची कला पाहून सभोवतालचे गणपती-स्टॉलधारक थक्क झाले. तेव्हापासून दरवर्षी तेथील विविध स्टॉलधारक अस्लमला बाप्पाच्या मूर्तीला फेटा बांधण्यासाठी बोलावतात.
 
यंदाही डोंगरी मैदान येथे अस्लमने बाप्पाच्या विविध मूर्तींना फेटे बांधून दिले. गेल्या तीन वर्षांपासून तो हे काम उत्साहाने करत आहे. नाशिकमधील डोंगरी मैदान, हिरावाडी, ठक्कर डोम अशा विविध भागांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागलेले असतात. तेथील मूर्तींना अस्लमकडून दरवर्षी फेटे बांधण्यात येतात. या वर्षी तर केवळ एकाच दिवसात त्याने तब्बल ३०० मूर्तींना फेटे बांधून दिले. बाप्पाच्या मूर्तीला अस्लमच्या फेट्याचा साज चढवला गेल्यामुळे मूर्ती अधिकच आकर्षक वाटतात. त्याच्या या कलेचे हिंदू-मुस्लिम बांधवांकडून सर्वत्र कौतुक होते.

महाराष्‍ट्रीय, राजस्थानी, पेशवाई, कोल्हापुरी असे विविध प्रकारचे फेटे-पगड्या बांधणारा अस्लम सांगतो, ‘‘मी फेटा बांधलेल्या बाप्पाच्या मूर्तींची शहराच्या विविध भागांत घरोघरी प्रतिष्ठापना होते याचा मला विशेष आनंद आणि समाधान आहे. श्रद्धेत आणि आनंदात कुठलीही जातपात नसते. ‘स्वतःसह इतरांचा आनंद’ यात सर्व काही आहे. याच हेतूने बाप्पाच्या मूर्तीला फेटे बांधण्याचे काम मी करतो.’’ अस्लमसारखा तरुण आपल्या कला-कौशल्याच्या साह्यानं सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेले त्याचे हे कार्य, हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

धुळ्यातील मानाच्या खूनी गणपतीवर मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी
धुळ्यातील मानाच्या पहिल्या ‘खुनी गणपती’ची मूर्ती विसर्जन मिरवणूक हिंदू- मुस्लीम ऐक्याचा आदर्श घ्यावा अशी असते. यंदा खूनी गणपतीच्या पालखीवर जुने धुळ्यातील खूनी मशिदीजवळ मुस्लीम बांधवांनी पुष्पवृष्टी केली. १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्या काळी गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक धुळ्यातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात होती. त्यावेळी मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला.
 
काही वेळाने वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. या घटनेत बरेच लोक मृत्यूमुखी पडले. त्यावरून खुनी मशीद व खुनी गणपती, असे नाव रूढ झाले. यानंतर हाच गणपती हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ठरला आहे.
 
 
मुस्लीम बांधवांनी केली आरती
अनंत चतुर्थीला गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मानाच्या खुनी गणपतीची जुन्या धुळ्यातून विसर्जन मिरवणूक निघाली. सर्व जाती-धर्माचे भाविक मानाच्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. सजविलेल्या पालखीतून या गणरायाची मिरवणूक निघाली. वारकरी परंपरा, पारंपारिक वाद्य, टाळ-मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. ती सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खुनी मशिदीजवळ पोचली. गर्दी उसळल्यानंतर भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणरायाची महाआरती झाली. महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, माजी आमदार प्रा. शरद पाटील, मंडळाचे अध्यक्ष उमेश महाजन आदी उपस्थित होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला गेला.
 
गणेशोत्सवात असे सहभागी होतात मुंबईकर मुस्लिम
‘विविध भाषिक, प्रांतिक व धार्मिक लोकांना सामावून घेणारे शहर’ अशी ओळख असलेली मुंबई गणेशोत्सवानिमित्त सर्वधर्मसमभावाचा संदेश देते. मुंबईतील या दहा दिवसांतील वैशिष्ट्य सांगायचे तर हिंदू व मुस्लिमधर्मीय बांधव अतिशय अगत्याने, आनंदाने एकत्र येत विघ्नहर्त्या गणरायाचे मनोभावे पूजन करतात. गोवंडीतील स्थानिक रहिवासी अन्वर कुरेशी यासंदर्भात सांगतात, ‘‘आमच्या विभागाच्या मंडळात मी व माझे मित्र लहानपणापासून आनंदाने सहभागी होतो. मंडळातर्फे आम्हाला दिली जाणारी सर्व कामे व जबाबदाऱ्या आम्ही पार पाडतो. कोरोनाकाळात दोन वर्षे सर्व काही बंद होते. मात्र, गेल्या वर्षीपासून पुन्हा एकदा आम्ही गणेशोत्सवाचा आनंद साजरा करत आहोत.’’
 
तर, वरळीपरिसरात राहणारे हमीद अन्वर म्हणतात, ‘‘गेली अनेक वर्षे आमच्या मंडळातील गणपतीची आरास सजवण्यासाठी मी पहाटे दादरच्या फूलबाजारात जाऊन ताजी फुले घेऊन येतो. याशिवाय, रोषणाईच्या कामातही सेवा म्हणून काही मुस्लिम व्यावसायिक आपल्याकडील साहित्य दरवर्षी विनामूल्य देतात.’’ ‘मुंबईकरांच्या अभिमानाचा मानबिंदू’ अशी ज्याच्याविषयी  गणेशभक्तांमध्ये भावना आहे तो लालबागचा राजा ज्या वेळी विसर्जनासाठी नागपाडा येथे पोहोचतो त्या वेळी तेथील मुस्लिम समुदायातर्फे त्याचे जोरदार स्वागत केले जाते व मिरवणुकीत सहभागी असलेल्या भाविकांना शाही सरबतही दिले जाते. लालबागच्या राजाची मिरवणूक दक्षिण मुंबईतील मुस्लिमबहुल भागांमधून म्हणजेच - भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, गिरगाव चौपाटी - अशा मार्गानेच दरवर्षी निघत असते.

गणरायाच्या पूजेसाठी मुस्लिम बांधवांच्या दुकानातील हळदी-कुंकू
नाशिकमध्ये मुस्लिम बांधवांकडे विक्रीस असलेल्या हळद-कुंकवाने आणि पूजासाहित्याने उत्साहात बाप्पा घरोघरी विराजमान झाले होते. या वेळी हिंदू-मुस्लिम असा कुठलाही रंग दिसला नाही, तर दिसला तो केवळ भक्तीचा रंग. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाची स्थापना करण्यापूर्वी हळद-कुंकू, गुलाल, कापूर, कापूस, लाल रंगाचं वस्त्र अशा विविध प्रकारच्या पूजासाहित्याने पूजा करण्यात येते. या प्रकारच्या सर्व साहित्यविक्रीची मुस्लिम बांधवांची दुकाने गणेशमूर्तींच्या स्टॉलच्या बाहेर आढळून आली. मूर्ती खरेदी केल्यानंतर हिंदू बांधव हे मुस्लिम बांधवांच्या दुकानातून पूजेचे साहित्य खरेदी करताना दिसून आले. पूजासाहित्य कुठल्या दुकानातून किंवा कुठल्या बांधवांकडून आले याचा भेदभाव जर बाप्पाने केला नाही, तर इतरांकडून असा भेदभाव का केला जातो, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडताना दिसला.
 
‘सर्व बांधव एक आहेत... कोणताही धर्म वर्णभेद, जातिभेद असा कुठलाही भेदभाव शिकवत नाही,’ हेच या दृश्यावरून दिसून आले. मुस्लिम बांधवांची अनेक कुटुंबे पूजासाहित्याची विक्री पिढ्यान् पिढ्या करत आली आहेत, तर हिंदू बांधवही पूजेसाठी त्यांच्याकडूनच खरेदी करत आले आहेत. हे धार्मिक-सामाजिक एकतेचे मोठेच प्रतीक आहे. यासंदर्भात बोलताना आनंद व्यक्त करत साहित्यविक्रेते कय्यूम अत्तार म्हणाले, ‘‘हळद-कुंकवासह अन्य पूजासाहित्याची विक्री आम्ही पिढ्यान् पिढ्या करत आलो आहोत. याच व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. बाप्पासह विविध देव-देवतांची पूजा आम्ही विक्री केलेल्या पूजासाहित्यातून होत असते याचा आम्हाला अभिमान वाटतो .’’

विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी दिला मुस्लिम सहकाऱ्यांना पूजेचा मान
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा’त अनेक उपक्रम राबवले जातात. गेल्या सात-आठ वर्षांपासून विद्यापीठाच्या परिसरात ‘विद्यापीठ कर्मचारी संघटने’च्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्व कर्मचारी भक्तिभावाने यात सहभागी होतात. शुक्रवारी (ता. २२ सप्टेंबर) विद्यापीठातील मुख्तार शेख, नसीर देशमुख, सलीम शेख आदी मुस्लिम कर्मचारी बांधवांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.‘विद्यापीठ कर्मचारी संघटने’ने या उपक्रमातून सामाजिक सलोख्याचा आणि एकोप्याचा संदेश दिला आहे.
 
संपूर्ण दहा दिवस विविध कार्यक्रमांद्वारे उत्सव साजरा केला जातो. महाप्रसादाचे सर्वांना वाटप केले जाते. या वेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, सचिव रविकांत हुक्किरे, खजिनदार हरीश गारमपल्ली, मार्गदर्शक-सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, परीक्षा प्रभारी संचालक डॉ. मलीक रोकडे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, संगमेश्वर मठ, प्रशांत भोसले, पंकेश व्हनमाने, शिवा बोराळे, मेजर ताटे, हणमंत लोखंडे, महेश पवार, सदानंद भादुले आदी उपस्थित होते.

धार्मिक सलोखा जपणारा नाशिकचे ‘भद्रकाली-तलावडी मित्रमंडळ’
भद्रकाली-तलावाडी परिसरातील ‘नटराज बंधू मित्रमंडळा’ने (भद्रकालीचा राजा) गणेशोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. मुस्लिमबहुल भागातील या मंडळाचे यंदाचे ३१ वे वर्ष होते. या मंडळातर्फे हिंदू-मुस्लिमधर्मीय तरुणांकडून उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून गणेशोत्सवासह येथील सय्यदशाह बाबा यांचा ‘संदल शरीफ’देखील उत्साहात साजरा केला जातो.
 
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्येही बहुसंख्य मुस्लिम बांधव आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम बांधवांचे संबंध दिवसेंदिवस घट्ट होत गेले आहेत. येथील मुस्लिम तरुणांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत रोज सकाळी परिसराची स्वच्छता आणि बाप्पाची आरती केली.  

मुस्लिम कारागीर साकारत आहेत नगरमधील श्रीविशाल गणेशमंदिर
अहमदनगर (अहिल्यानगर) येथील श्रीविशाल गणेशमंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम कारागीर गेल्या सुमारे अठरा वर्षांपासून घाम गाळत आहेत. यापूर्वी शनिमंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गोगादेव मंदिर या मंदिरांबरोबरच राजस्थानमधील या कारागिरांनी बिर्लांच्या लक्ष्मी-नारायणमंदिराची उभारणी केली आहे. हैदराबाद येथील बालाजीचे मंदिरही त्यांच्या कलेतून साकारले आहे. धार्मिक वातावरण गढूळ झालेल्या या काळात ही सामाजिक समरसता सुखावणारी आहे.
 
नगरच्या माळीवाड्यातील या गणेशमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्य कारागीर खालिद शेख यांच्या मार्गदर्शनात मंदिराची उभारणी होत आहे. राजस्थानातील या मुस्लिमधर्मीय कारागिरांनी आतापर्यंत मशीद, दर्गे यांपेक्षा मंदिरेच जास्त संख्येने उभारली आहेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻

 

हिंदू-मुस्लीम धार्मिक सलोखा जपणारे भद्रकाली तलावडी मित्र मंडळ


मुस्लिम कारागिर साकारत आहेत नगरमधील श्री विशाल गणेश मंदिर


गणरायाच्या पूजेसाठी मुस्लीम बांधवांच्या दुकानातील हळदी-कुंकू


गणेशोत्सवात असे सहभागी होतात मुंबईकर मुस्लीम

 

धुळ्यातील रिजवानने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, मिळवले बक्षीस!

 

श्रीगणेशाला अभिवादन करणारे उर्दू साहित्य

 

गणपती बाप्पाला साजशृंगार करणारा नाशिकचा अस्लम


विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिला मुस्लीम सहकाऱ्यांना पूजेचा मान


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook 

| Twitter | Instagram | YouTube