Story by आवाज़ मराठी | Published by Chhaya Kavire • 1 Years ago
धुळे : खूनी मशिदीजवळ मानाच्या खूनी गणपतीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करताना हिंदू- मुस्लीम बांधव. (छायाचित्र : गोरख गर्दे)
धुळे : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेला मानाच्या पहिल्या खूनी गणपतीच्या पालखीवर जुने धुळ्यातील खूनी मशिदीजवळ गुरूवारी (ता. २८) पुष्पवृष्टी करण्यात आली. भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात गणपतीसह विविध मंडळांच्या व घरगुती गणेशाला भावपूर्ण निरोप दिला गेला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची आग्रा रोडवरील मुख्य मिरवणुकीतून मध्यरात्रीनंतर एक वाजता सांगता झाली. डोळ्यांचे पारणे फेडणारा विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पोलिसांच्या परिश्रमाने निर्विघ्नपणे पार पडला.
धुळ्यातील मानाच्या पहिल्या ‘खुनी गणपती’ची मूर्ती विसर्जन मिरवणूक हिंदू- मुस्लीम ऐक्याचा आदर्श घ्यावा अशी असते. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्या काळी गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक धुळ्यातील जुन्या शाही जामा मशिदीवरुन जात होती. त्यावेळी मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला. काही वेळाने वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि ब्रिटीश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. या घटनेत बरेच लोक मृत्यूमुखी पडले. त्यावरून खुनी मशीद व खुनी गणपती, असे नाव रूढ झाले. यानंतर हाच गणपती हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ठरला आहे.
मुस्लीमांच्या हस्ते आरती
अनंत चतुर्थीला गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मानाच्या खुनी गणपतीची जुन्या धुळ्यातून विसर्जन मिरवणूक निघाली. सर्व जाती-धर्माचे भाविक मानाच्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. सजविलेल्या पालखीतून या गणरायाची मिरवणूक निघाली. वारकरी परंपरा, पारंपारिक वाद्य, टाळ-मृदुंगाच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. ती सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खुनी मशिदीजवळ पोचली. गर्दी उसळल्यानंतर भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणरायाची महाआरती झाली. महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, माजी आमदार प्रा. शरद पाटील, मंडळाचे अध्यक्ष उमेश महाजन आदी उपस्थित होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला गेला.
-निखील सूर्यवंशी, धुळे
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻