MV Cape Dao Attack: ओमानजवळ व्यावसायिक जहाजावर ड्रोन हल्ला, एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
ओमानच्या किनारपट्टीवर व्यावसायिक जहाजावर हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू
ओमानच्या किनारपट्टीवर व्यावसायिक जहाजावर हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू

 

नवी दिल्ली 

ओमानच्या किनारपट्टीजवळ एका व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दुर्दैवी हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, समुद्रातील व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रकार तातडीने थांबायला हवेत, अशी स्पष्ट भूमिका भारताने मांडली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, 'एमव्ही केप दाओ' (MV Cape Dao) या व्यावसायिक जहाजावर २० भारतीय खलाशी सवार होते, त्यापैकी १९ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मस्कतमधील भारतीय दूतवास या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, भारतीय खलाशांच्या लवकरात लवकर स्वदेशी परतण्यासाठी ओमानच्या प्रशासनाशी सतत समन्वय साधत आहे.

आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर सुरक्षिततेची मागणी

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या क्षेत्रातील व्यावसायिक नौवहनवरील (Commercial shipping) सततचे हल्ले अत्यंत चिंतेचा विषय आहेत. तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण पुन्हा एकदा संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करत आहोत. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील मुक्त आणि सुरळीत व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे, असे भारताने म्हटले आहे. संकटकाळात मदत केल्याबद्दल भारताने ओमानच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत.