India At UNGA: भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल; 'दहशतवादाचे परिणाम गंभीर असतील'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 3 h ago
संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडला.
संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पाडला.

 

नवी दिल्ली: 

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) भारताने पाकिस्तानचा खोटेपणा आणि दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढत त्यांना सडकून इशारा दिला आहे. "दहशतवादाला असेच खतपाणी घालत राहिल्यास पाकिस्तानला याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील," असा सणसणीत दम भारताने भरला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आणि २०२५ च्या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'वेळेवर केलेल्या हस्तक्षेपा'चे कौतुक केले. यावर भारताने 'राईट टू रिप्लाय' (Right of Reply) अंतर्गत उत्तर देताना पाकिस्तानच्या या 'कठपुतळी' (Puppet) सरकारची संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरच पिसे काढली. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी समितीच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत (Petal Gahlot) यांनी भारताची बाजू अत्यंत आक्रमकपणे आणि मुद्देसूद मांडली.

लष्कराचे, लष्कराकडून आणि लष्करासाठी चालणारे सरकार!

पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधत म्हटले की, "ज्या देशाची राजधानी याच क्षणी स्वतःच्याच जनतेपासून वाचवण्यासाठी किल्ल्यासारखी बंदिस्त केली जात आहे, त्या देशाकडून लोकशाही आणि मानवी मूल्यांच्या गप्पा ऐकणे म्हणजे मोठा ढोंगीपणा आहे. पाकिस्तानचे सरकार हे 'लष्कराचे, लष्कराने आणि लष्करासाठी' (Of the army, by the army, and for the army) चालवलेले सरकार आहे. येथील बाहुले (पंतप्रधान) येतील आणि जातील, पण खरी सत्ता कोणाच्या हातात आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका नसावी."

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शाहबाज शरीफ सरकारने मंजूर केलेल्या २७ व्या घटनादुरुस्तीचा संदर्भ देत भारताने पाकिस्तानचे वास्तव जगासमोर आणले. या दुरुस्तीमुळेच पाकिस्तानचे 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना कोणत्याही कायदेशीर कारवाईतून आयुष्यभरासाठी मुभा (Immunity) मिळाली आहे.

ओसामा बिन लादेन आणि ९/११ ची आठवण

शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रात केलेले विचित्र वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अवघे जग न्यू यॉर्कमध्ये झालेल्या ९/११ च्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा २५ वा स्मृतिदिन पाळत आहे. भारताने जगाला अत्यंत मार्मिकपणे आठवण करून दिली की, या भयंकर हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या प्रमुख लष्करी अकादमीच्या अगदी उंबरठ्यावरच लपून बसला होता!

काश्मीर आमचाच; आधी 'पीओके' मधील अत्याचार थांबवा!

काश्मीर प्रश्नावर भारताने अत्यंत ठामपणे सुनावले की, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे आणि तो कायम राहील. "जर काश्मीरवर बोलायचेच असेल, तर आधी पाकव्याप्त काश्मीर (PoK) कडे लक्ष द्या. रावळकोटमधील जनतेला विचारा, तिथे कशा प्रकारे निरपराध लोकांच्या हत्या, क्रूर हिंसाचार आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन सुरू आहे," असा खणखणीत सवाल गेहलोत यांनी विचारला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून १२ वादग्रस्त निर्वासित जागांवरून मोठी आंदोलने सुरू आहेत. तिथे नुकत्याच झालेल्या तथाकथित विधानसभा निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप होत असून सुरक्षा दलांकडून जनतेची गळचेपी केली जात आहे.

'ऑपरेशन सिंदूर' आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर

सीमेपलीकडील दहशतवादाच्या पाकिस्तानच्या जुन्या सवयीवरही भारताने कडक इशारा दिला. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. याचा बदला म्हणून भारताने गेल्या वर्षी ७ मे रोजी थेट पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) राबवले होते. "दहशतवाद्यांना लपण्यासाठी आता कोणतीही जागा उरणार नाही, हे आम्ही गेल्याच वर्षी दाखवून दिले आहे. दहशतवादाविरोधात स्वतःचे रक्षण करण्याचा आमचा अधिकार आम्ही नक्कीच वापरू," असा सज्जड दम भारताने दिला.

अल्पसंख्याकांवरील अन्याय आणि ईशनिंदा कायदे

भाषणाच्या शेवटी गेहलोत यांनी पाकिस्तानच्या धार्मिक असहिष्णुतेवरही जोरदार प्रहार केला. "ज्या देशाचा मुख्य आधारच ईशनिंदेचे (Blasphemy) जाचक कायदे आहेत, त्या देशाने या महासभेत धार्मिक सहिष्णुतेवर बोलणे हास्यास्पद आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाते, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळे तुमचे हे खोटे अश्रू कोणाचीही दिशाभूल करू शकत नाहीत," असे भारताने निक्षून सांगितले.