अर्सला खान
"वय वर्ष अवघं २३... पण तिच्या आवाजात जेवढी जादू आहे, तेवढीच ताकद तिच्या विचारांमध्येही आहे. एका बाजूला बॉलिवूड गाजवणारी गायिका, तर दुसऱ्या बाजूला बालविवाह, मुलांचं आरोग्य अन् मानसिक आरोग्यासाठी लढा देणारी युनिसेफची युवा दूत."
असमच्या बिश्वनाथ चारियाली या छोट्या शहरात फातिमा आणि अन्वर अंसारी यांच्या पोटी जन्मलेल्या नाहीद आफ्रिन हिची ही गोष्ट. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी नाहीदने स्वतःची ओळख केवळ एक प्रसिद्ध गायिका म्हणून मर्यादित ठेवली नाही. युनिसेफ इंडिया सोबत एकत्र येऊन लहान मुलांचे हक्क, बालविवाह, कुपोषण, मानसिक आरोग्य, हवामान बदल आणि STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) मध्ये मुलींचा सहभाग अशा गंभीर विषयांवर ती सातत्याने काम करत आहे.
सध्या ती मुंबईच्या प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजमधून सायकॉलॉजीमध्ये (मानसशास्त्र) एम.ए. चे शिक्षण घेत आहे. नाहीद, तिचा लहान भाऊ, आई आणि वडील असा तिचा चार जणांचा परिवार. बालपणापासूनच नाहीदला संगीताची प्रचंड आवड होती. शालेय जीवनातच तिने स्वतःच्या गळ्याच्या जोरावर अनेक पारितोषिके पटकावून असमचे नाव उज्ज्वल केले.
इंडियन आयडॉल ते बॉलिवूडचा प्रवास
नाहीदला खऱ्या अर्थाने पहिली मोठी ओळख मिळाली ती २०१५ मधील इंडियन आयडॉल ज्युनिअर या शोमधून. या स्पर्धेत ती सेकंड रनर-अप ठरली. तिच्या सुरेल आवाजाने देशभरातील रसिकांच्या मनावर राज्य केले.
तिथून तिने थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ चित्रपटातून तिने प्लेबॅक सिंगिंगला सुरुवात केली. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि नामवंत कलाकारांसाठी गाणी गाऊन तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण ही तर तिच्या प्रवासाची फक्त सुरुवात होती.
बालविवाहाविरुद्ध लढा
नाहीदच्या आयुष्याला खरा कलाटणी देणारा टप्पा आला २०१८ मध्ये. शाळा शिकत असतानाच युनिसेफ इंडियाने तिची ईशान्य भारतासाठी 'चाइल्ड राइट्स चॅम्पियन' म्हणून निवड केली. एवढ्या लहान वयात मुलांच्या हक्कासाठी काम करण्याची संधी मिळणे ही खूप मोठी गोष्ट होती.
तिने हाती घेतलेल्या सामाजिक कामांपैकी बालविवाहाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा होता. या मोहिमेबद्दल सांगताना नाहीद म्हणते, "लहान वयात लग्न झाल्यामुळे मुलांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणावर अन् भविष्यावर वाईट परिणाम होतो. बालविवाहाऐवजी मुलांना शिक्षण आणि स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी."
२०१८ मध्ये युनिसेफने असम विधानसभेत बालविवाहाविरोधात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. नाहीद २०२० पर्यंत बालविवाह विरोधी मोहिमांमध्ये अतिशय सक्रियपणे सहभागी झाली होती.
मुलींचे शिक्षण अन् 'STEM' मध्ये सहभाग
नाहीदचे काम फक्त बालविवाहापुरते मर्यादित राहिले नाही. तिने मुलांचे हक्क, मानसिक आरोग्य, हवामान बदल आणि विशेषतः STEM मध्ये (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी अन् गणित) मुलींची भागीदारी वाढवण्यासाठी आवाज उठवला.
मुलींच्या शिक्षणावर भर देताना ती सांगते, "मुलींनासुद्धा विज्ञान, तंत्रज्ञान अन् शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी समान संधी मिळायला हवी."
तिच्या या सामाजिक तळमळीची दखल घेत २०२३ मध्ये युनिसेफ इंडियाच्या प्रादेशिक कार्यालयाकडून तिला 'UNICEF India Youth Advocate' म्हणून घोषित करण्यात आले. भारतातील मोजक्याच तरुणांना हा बहुमान मिळतो.
ग्रामीण आरोग्य, पोषण अन् मानसिक आरोग्यासाठी पुढाकार
ग्रामीण भागातील मुलांचे आरोग्य आणि पोषणाचा प्रश्न नाहीद खूप महत्त्वाचा मानते. अनेक ग्रामीण कुटुंबांत बाळाच्या जन्मानंतर स्तनपान आणि सुरुवातीच्या पोषणाविषयी पुरेशी माहिती नसते. युनिसेफच्या माध्यमातून ती अशा कुटुंबांपर्यंत योग्य माहिती पोहोचवत आहे.
आपल्या या विचारांबद्दल सांगताना नाहीद एका वाक्यात सुंदर विचार मांडते, "समाज बदलण्यासाठी वय मोठे असणे गरजेचे नाही, तर विचार बुलंद असणे गरजेचे आहे."
यासोबतच आजच्या तरुणाईमधील वाढता ताणतणाव, अभ्यास अन् भविष्याची भीती यावरही ती मोकळेपणाने बोलते. मानसिक आरोग्याविषयी तरुणांनी स्वतःच्या अडचणी लपवण्याऐवजी संवाद साधला पाहिजे, असा तिचा आग्रह असतो.
आवाजाची जादू अन् समाज बदलाचा ध्यास
एका बाजूला रूपेरी पडद्यावर गाणारी एक लोकप्रिय गायिका आणि दुसऱ्या बाजूला मुलांच्या भविष्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ती... नाहीद आफ्रिनची हीच खरी ताकद आहे. मनोरंजन क्षेत्रातील आपल्या प्रसिद्धीचा वापर तिने समाजातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी केलाय.
२३ वर्षांच्या या मुलीचा हा प्रवास स्पष्ट सांगतो की, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वयाची अट नसते, फक्त मनात पक्की जिद्द असावी लागते.