विदुषी गौर
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून इतिहास रचणाऱ्या नाहिदा मंझूर यांच्या मनात एकच खंत आहे. त्या म्हणतात, भारतात अजूनही मुली पर्वतारोहणाकडे वळत नाहीत. पण हीच परिस्थिती बदलण्यासाठी काश्मीरची ही धाडसी कन्या आता स्वतः मैदानात उतरलीये.
श्रीनगरच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत कसा पोहोचला, याची कथा प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलवणारी आहे. ‘आवाझ-द-व्हॉईस’शीबोलताना नाहिदाने आपल्या या थरारक प्रवासाचे पैलू उलगडले.
नाहिदा आवर्जून सांगते की, "पर्वतारोहण म्हणजे फक्त एव्हरेस्टसारखी मोठी शिखरे गाठणे नव्हे. “पर्वतारोहण माणसाला पर्वतांचा खरा अनुभव देतं, शारीरिक आणि मानसिक ताकदीची परीक्षा घेतं आणि स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देतं."
"मागे कुणीही सुटणार नाही..."
पर्वतारोहणात व्यावसायिक नफा मिळवणे हा नाहिदाचा कधीच उद्देश नव्हता. ती 'पंपोरी अँड डॉटर्स ॲडव्हेंचर' (Pampori and Daughters Adventure) ही संस्था चालवते, ज्याद्वारे ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि साहसी खेळांचे आयोजन केले जाते.
आपल्या कार्यपद्धतीबद्दल सांगताना नाहिदा म्हणते, “माझा एकच साधा नियम आहे तो म्हणजे माझ्यासोबत आलेला कोणताही माणूस मागे सुटता कामा नये.”
ट्रेकिंगदरम्यान ती नेहमी सर्वांच्या शेवटी चालते, जेणेकरून सर्वात हळू चालणाऱ्या व्यक्तीवर तिचे लक्ष राहील. तिच्यासाठी वेगाने पुढे जाण्यापेक्षा किंवा वेळेत पोहोचण्यापेक्षा लोकांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
एव्हरेस्टवर फडकलेला तिरंगा
नाहिदाने काश्मीरच्या टेकड्यांवर लहानपणी मारलेल्या फेरफटक्यांचे रुपांतर पुढे करिअरमध्ये झाले. २०१९ मध्ये नाहिदा काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला ठरली, जिने ८,८४८ मीटर उंच माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. शेरपा मार्गदर्शक निमा कांचा यांच्या साथीने तिने पहिल्याच प्रयत्नात हे शिखर सर केले.
पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या मोहिमेसाठी तब्बल ३० लाख रुपयांचा खर्च येणार होता. पुरेशा प्रायोजकत्वाअभावी तिने क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली. सरकारी अधिकारी, सामाजिक संस्था अन् सर्वसामान्य लोकांच्या मदतीतून तिचे हे स्वप्न साकार झाले.
आपल्या आव्हानांबद्दल बोलताना ती म्हणते, “पर्वत म्हणजे फक्त जिंकण्याची जागा नाही. ती अशी जागा आहे जिथे धैर्य पारखले जाते आणि स्वतःच्या सीमा ओलांडल्या जातात.”
खडतर प्रशिक्षण अन् जिद्दीचा प्रवास
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील प्रतिष्ठित नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (NIM) मधून नाहिदाने पर्वतारोहणाचे प्रगत प्रशिक्षण घेतले. यासोबतच तिने रॉक क्लायंबिंग आणि स्कीइंगचे धडेही गिरवले.
प्रशिक्षणादरम्यान स्टॅमिना वाढवण्यासाठी ती मुद्दाम पाठीवर जास्त वजनाची बॅग घेऊन चालायची. एव्हरेस्टच्या आधी तिने हिमाचल प्रदेशातील माउंट देव टिब्बा, फ्रेंडशिप पीक, तसेच जम्मूमधील माउंट महादेव अन् तटाकुटी ही शिखरे यशस्वीपणे सर केली होती.
नुकतेच तिने सनसेट पीक (४,७४५ मीटर), शाईन मान पीक (४,३०० मीटर) आणि काश्मीरचे प्रसिद्ध माउंट हरमुख सर केले. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी तिने ५,१४२ मीटर उंचीवरील माउंट हरमुखवर यशस्वी चढाई नोंदवली.
खेळाची आवड अन् कुटुंबाची भक्कम साथ
श्रीनगरजवळील झेवान भागात नाहिदा लहानाची मोठी झाली. तीन बहिणींमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची. लहानपणी ती बॅडमिंटन, व्हॉलीबॉल अन् टेबल टेनिससारख्या खेळांमध्ये पारंगत होती. नॅशनल लेव्हलच्या टेबल टेनिस स्पर्धेसाठी तिची निवडही झाली होती, पण शेवटी पर्वतारोहणाने तिचे मन जिंकले.
तिचे वडील मंजूर अहमद पंपोरी यांनी तीनही मुलींना क्रीडा क्षेत्रात उतरण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल नाहिदा आवर्जून सांगते, “मुलगी करू शकत नाही, अशी जगात कोणतीच गोष्ट नाही! माझ्या आई-वडिलांनी मला माझी वेगळी स्वप्ने जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले.”
पुलवामात पॅराग्लायडिंग
एव्हरेस्ट सर केल्यानंतर नाहिदा थांबली नाही, तर तिने आपले काम अधिक विस्तारले. काश्मीरमध्ये साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी तिने २०२४ मध्ये पुलवामातील अवंतीपोरा जवळील बारसू गावात पॅराग्लायडिंग उपक्रम सुरू केला. या माध्यमातून तिने अनेक स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. काश्मीरच्या टेकड्यांवरून सुरू झालेला नाहिदाचा हा प्रवास आज भारतातील हजारो तरुणींसाठी प्रेरणेचा नवा स्त्रोत ठरत आहे.