आफ्रिन जाबी : वयाच्या २१ व्या वर्षी समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी जलपरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
आफ्रिन जाबी
आफ्रिन जाबी

 

शांतीप्रिय रायचौधरी

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी लांब पल्ल्याच्या पोहण्याच्या शर्यतीत मेख ठोकणारी मेदिनपूरची आफ्रिन जाबी. इंग्लिश खाडी अन् पालकाची सामुद्रधुनी पार करून जगभर नाव गाजवल्यानंतर, आता अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची कॅटलिना खाडी पार करण्याचा तिने विडा उचललाय.

पश्चिम मेदिनपूर शहरातील मेदिनपूर स्विमिंग क्लबची ही खेळाडू मूळची खडकपूरच्या २ ब्लॉकच्या चौपिना गावची. आज फक्त बंगालचीच नाही, तर संपूर्ण भारताची लांब पल्ल्याची पोहणारी एक उज्वल तारा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. २९ जुलै २०२५ रोजी तिने इंग्लिश खाडी पार केली, तर याच वर्षातील ९ मे रोजी भारत अन् श्रीलंकेमधील पालकाची सामुद्रधुनी सर केली. आता याच वर्षी २२ सप्टेंबरला ती कॅटलिना खाडीच्या लाटांशी दोन हात करायला सज्ज झालीये.

राष्ट्रीय स्तरापासून सुरू झालेला जलपरीचा प्रवास
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवायच्या आधी आफ्रिनने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली होती. पश्चिम बंगालच्या राज्यस्तरीय वयोगट आणि शालेय जलतरण स्पर्धेत तिने अनेक पदकांवर आपले नाव कोरले. याच कामगिरीच्या बळावर तिने राष्ट्रीय ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये दोनदा बंगालचे प्रतिनिधित्व केले. विद्यासागर विद्यापीठाकडून खेळताना अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धेत तीनदा सहभाग नोंदवला.

खेलो इंडिया अन् नॅशनल स्कूल गेम्स फेडरेशनच्या स्पर्धांमध्येही तिने पदके जिंकली. गंगा नदीत झालेल्या जगातील सर्वात लांब अशा ८१ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्विमिंग स्पर्धेत महिलांच्या गटात दुसरा क्रमांक पटकावून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय १३, २१ अन् २४ किलोमीटरच्या खुल्या समुद्रातील शर्यती तिने लिलया पूर्ण केल्या आहेत.
 

अभ्यासातही अव्वल अन् खेळाची आवड!
खेळात पुढे असतानाच आफ्रिनने शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. सध्या ती अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये 'फिजिकल एज्युकेशन'चे शिक्षण घेत आहे. याआधी मेदिनपूर कॉलेजमध्ये समाजशास्त्र विषयात शिकत असताना तिने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. समुद्राच्या लाटांवर स्वार होत आंतरराष्ट्रीय आव्हाने पेलत असतानाच तिने उच्च शिक्षणही तितक्याच ताकदीने सुरू ठेवले आहे.

यशाचे शिखर दिसत असले तरी आफ्रिन अन् तिच्या कुटुंबाचा प्रवास सोपा राहिलेला नाही. एका अत्यंत साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून ती येते. तिचे वडील शेख पियार अली वाहतूक व्यावसायिक आहेत. आपल्या मुलीच्या शिक्षणाचा आणि पोहण्याच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलताना त्यांची मोठी दमछाक होतेय. एकेक खाडी पार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो.

आपल्या अडचणींवर बोलताना तिचे वडील पियार अली सांगतात, “एकिकडे मुलीला नियमित ट्रेनिंग देणे आणि दुसरीकडे पैशांची जुळवाजुळव करणे, असा दोन्ही बाजूंनी पेच निर्माण झालाय. माझ्या छोट्या व्यवसायातून एवढा मोठा खर्च भागवणे कठीण जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळणारी मदत पुरेशी नाही. शासनाने काही मदत करावी अन् दानशूर लोकांनी पुढे यावे, हीच विनंती आहे. जेणेकरून मेदिनपूरसारख्या शहरात राहूनही माझी मुलगी सात समुद्र पार करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल.”

तिचे वडील पियार अली अन् आई सबिना परवीन नेहमीच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 'कोनी' चित्रपटातील खिड्डा सरांसारखे तिचे वडील तिच्यासाठी मार्गदर्शक ठरलेत. समुद्रात जेव्हा ती जोरदार प्रवासाशी लढत असते, तेव्हा तिचे वडील किनाऱ्यावरून ओरडून तिची जिद्द वाढवतात, “फाईट जाबी, टाईट!”
 

सात समुद्र पार करून जागतिक विक्रम करण्याचा ध्यास
पश्चिम मेदिनपूरची इलेक्शन आयकॉन आणि बंगालची शान असलेली आफ्रिन जाबी आपल्यापुढील ध्येयाबद्दल स्पष्ट बोलते.

तिच्या स्वप्नांबद्दल सांगताना आफ्रिन म्हणते, “इंग्लिश खाडी अन् पालकाची सामुद्रधुनी सर केल्यानंतर अमेरिकेची कॅटलिना खाडी पार करणे हे माझे पुढचे मोठे पाऊल आहे. पण माझ्या आयुष्याचे मुख्य अन् अंतिम ध्येय जगातील सर्वात कठीण अशा सात खाडी किंवा सामुद्रधुनी पार करून 'सात समुद्र' जिंकण्याचा जागतिक विक्रम रचणे हेच आहे.”

या कठीण प्रवासासाठी ही तरुण जलपरी आता तुम्हा-आम्हा सर्वांच्या शुभेच्छा अन् आशीर्वादाची अपेक्षा करत आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter