वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जवानांसाठी आणि देशासाठी प्राणांची आहुती देणारे कॅप्टन हनीफ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 3 h ago
वीर चक्र प्राप्त कॅप्टन हनीफ उद्दीन
वीर चक्र प्राप्त कॅप्टन हनीफ उद्दीन

 

अशहर आलम 

कॅप्टन हनीफ उद्दीन यांना सुमधुर आवाजाची देणगी मिळाली होती. सियाचीन आणि लडाखच्या कठीण आणि एकाकी वातावरणात ते अनेकदा आपल्या जवानांचं मनोबल वाढवायला त्यांना गाणी म्हणून दाखवत असत. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याशी लढताना त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी आपल्या सर्व जवानांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं आणि असामान्य शौर्य व अतूट मैत्रीची मोठी कहाणी मागे ठेवली. 

कारगिल युद्धादरम्यान त्यांनी इतर दोन सैनिकांसह पाकिस्तानी सैन्याला रोखून धरलं. त्यांचा शेवटचा जवान सुरक्षित स्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी शत्रूच्या हल्ल्यांचा पूर्ण मारा स्वतःवर झेलला. भारतीय सैन्यात या आनंदी, उत्साही आणि चैतन्यशील तरुण अधिकाऱ्याला सर्वजण प्रेमाने 'हनीफ' म्हणत असत. त्यांनी युद्धादरम्यान असामान्य धैर्य, निष्ठा आणि शौर्याचं दर्शन घडवलं. या सर्वोच्च बलिदानाबद्दल त्यांना मरणोत्तर 'वीर चक्र' प्रदान करण्यात आलं. 

त्यांच्या आई हेमा अझीझ या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. आपल्या मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी त्यांना युद्ध संपेपर्यंत वाट पाहावी लागली. असं असलं तरी त्यांनी आपल्या मुलाच्या बलिदानावर अभिमानाने मोठी प्रतिक्रिया दिली. “शत्रूशी लढताना आलेलं मरण, हाच त्याच्या शौर्याचा सर्वात मोठा पुरावा आहे”, असं त्या म्हणाल्या.


संस्कृती, शिस्त आणि शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या कुटुंबात हनीफ लहानाचे मोठे झाले. हनीफ आणि त्यांचे भाऊ समीर व नफीस लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आईनेच या सर्वांचा सांभाळ केला. हेमा अझीझ या संगीत नाटक अकादमी आणि कथ्थक केंद्राशी जोडलेल्या प्रतिष्ठित शास्त्रीय गायिका आहेत. हनीफ यांना त्यांच्याकडूनच कधीही हार न मानणारी वृत्ती आणि गायनाची कला वारशाने मिळाली होती.

ते संगणकात आवड असलेले विज्ञानाचे पदवीधर होते. त्यासोबतच ते गुणवान गायक आणि महाविद्यालयीन परिसरातले लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्वाच्या गुणांमुळे त्यांना "मिस्टर शिवाजी" हा किताब मिळाला होता. मित्र आणि शिक्षकांमध्ये त्यांना मिळणारा आदर व प्रेम यातून स्पष्टपणे दिसून यायचं. 

६ जून १९९९ रोजी कॅप्टन हनीफ यांनी पाकिस्तानी सैनिकांना रोखायला एका विशिष्ट टेकडीवर ताबा मिळवला होता. पण गस्त घालत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या जवानांवर शत्रूकडून जोरदार गोळीबार सुरू झाला. गंभीर दुखापत होऊनही त्यांनी मागे हटायला नकार दिला. त्याऐवजी त्यांनी गोळीबाराची जागा घेतली आणि शत्रूला धैर्याने तोंड दिलं. आपल्या तुकडीतल्या इतर जवानांना सुरक्षित स्थळी जाता यावं, यासाठी त्यांनी स्वतःवर गोळीबार झेलत शत्रूला रोखून धरलं.

शत्रूच्या गोळ्या आणि तोफगोळ्यांचा पुन्हा जोरदार मारा त्यांच्यावर झाला. तरीही आपले सर्व जवान धोक्यातून बाहेर पडल्याची पूर्ण खात्री होईपर्यंत ते लढत राहिले. त्यानंतरच त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. 

हेही वाचा: भारतभूमीच्या रक्षणासाठी पॅरा कमांडो शाकिब पठाण यांचे सर्वोच्च बलिदान

सैन्यात रुजू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत आणि वयाची २५ वर्षं पूर्ण होण्याआधीच त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं. या कारवाईत नायब सुभेदार मांगेज सिंग आणि रायफलमन परवेश कुमार यांनाही वीरमरण आलं. शत्रूचा सततचा मारा आणि धोकादायक भौगोलिक परिस्थिती समोर होती. याच कारणास्तव युद्ध संपेपर्यंत कॅप्टन हनीफ यांचं पार्थिव परत आणता आलं नाही. त्यांच्या आई हेमा अझीझ यांनी सन्मानाने त्यांच्या महान वारशाचा गौरव केला. कॅप्टन हनीफ यांच्या हृदयाच्या जवळ असलेलं गाणं त्यांनी सर्वांना सांगितलं. त्यांचा धाकटा भाऊ समीर याने हे गाणं लिहिलं होतं. "एक पल में है सच सारी जिंदगी का; इस पल में जी लो यारों, यहां कल है किसने देखा," असे या गाण्याचे बोल आहेत. संपूर्ण आयुष्याचं सत्य एकाच क्षणात दडलंय आणि उद्या काय होणार हे कुणालाच माहीत नसतं, त्यामुळे हा क्षण पूर्णपणे जगून घ्या, असा या ओळींचा अर्थ आहे.