USA-IRAN WAR: हॉरमुझची सामुद्रधुनी लवकरच सुरू होणार?; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने जागतिक बाजारात आशा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 14 h ago
हॉरमुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य.
हॉरमुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य.

 

कैरो 

जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आणणाऱ्या आणि इंधन दरवाढीस कारणीभूत ठरलेल्या हॉरमुझच्या सामुद्रधुनीला (Strait of Hormuz) पुन्हा सुरू करण्याबाबतचा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराण आणि ओमान यांच्यात या महत्त्वपूर्ण जलमार्गाबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, यामुळे जागतिक व्यापाराला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कॅलिफोर्नियामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, या कराराबाबत खूप मोठी प्रगती झाली असून बुधवार किंवा गुरुवापर्यंत यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. या करारांतर्गत जहाजे इराणच्या नियंत्रणाखालील मार्गाने पर्सियन गल्फमध्ये प्रवेश करतील आणि ओमानच्या नियंत्रणाखालील मार्गाने बाहेर पडतील, अशी माहिती प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. तथापि, ट्रम्प प्रशासनाने यापूर्वी इराणला सामुद्रधुनीवर नियंत्रण देण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे.

लाल समुद्रात जहाजांवर हल्ले सुरूच

एकिकडे हॉरमुझच्या सामुद्रधुनीबाबत वाटाघाटी सुरू असतानाच, दुसरीकडे लाल समुद्रात व्यावसायिक जहाजांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. इराण समर्थित हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या ऑइल टँकरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी इराणमधील वाढत्या फाशीच्या शिक्षेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या नव्या घोषणेने आंतरराष्ट्रीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.